मुंबई : नागपूरच्या भोसले घराण्याचे संस्थापक राजे रघुजी भोसले यांची लंडनमधील लिलावात विक्री झालेली तलवार खरेदी करण्यासाठी ६९ लाख ९४ हजार ४३७ रुपये इतक्या रकमेला पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने मंजुरी दिली आहे. ही तलवार लिलावामध्ये प्रवीण चल्ला यांनी खरेदी केली होती. त्यांच्याकडून ती खरेदी करण्याचा निर्णय राज्य सरकारने आधीच घेतला होता. ही तलवार १८१७ मध्ये झालेल्या सीताबर्डीच्या (नागपूर) लढाईनंतर ईस्ट इंडिया कंपनीने केलेल्या लुटीचा भाग म्हणून लंडनला पोहोचली, असे म्हटले जाते. लंडन येथे २९ एप्रिल २०२५ रोजी झालेल्या लिलावात ही तलवार प्रवीण चल्ला यांनी खरेदी केली होती. त्यांच्याकडून राज्य सरकार आता ती विकत घेणार आहे.
राजे रघुजी भोसले (१६९५-१७५५) यांचा इतिहास महापराक्रमाचा राहिला आहे. मराठा साम्राज्याचा विस्तार त्यांनी बंगाल, ओडिशापर्यंत केला होता. त्याचवेळी कडप्पा आणि कुनलूलच्या नवाबांना पराभूत करून त्यांनी दक्षिण भारतावर वर्चस्व प्रस्थापित केले होते. तसेच चांदा, छत्तीसगड आणि संबलपूर या प्रदेशांवरही वर्चस्व गाजवले होते. त्यांच्या तलवारीचा ऐतिहासिक वारसा आता पुन्हा भारतात येण्याचा मार्ग मोकळा झाल्याने इतिहासप्रेमींमध्ये समाधान व्यक्त होत आहे.