Join us  

"हा आमचा महाराष्ट्र"; लक्षद्वीप-मालदीव वादात आता फडणवीसांनी दाखवलं सागरी सौंदर्य

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2024 3:05 PM

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही काही फोटो शेअर करत महाराष्ट्रातील निसर्ग सौंदर्याचं दर्शन घडवलं आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लक्षद्वीप समुद्रकिनाऱ्यावर जाऊन फेरफटका मारला. यावेळी, मोदींनी समुद्रात डुबकी घेऊन समुद्रतळाचीही पाहणी केली. मोदींच्या दौऱ्यामुळे लक्षद्वीपचं निसर्ग सौंदर्य जगभरात प्रकाशझोतात आलं. विशेष म्हणजे तब्बल इंटरनेटवर लक्षद्वीपचं सर्चिंग तब्बल ३००० टक्क्यांनी वाढल्याचं एका अहवालातून समोर आलं आहे. तर, लक्षद्वीपच हे कौतुक पाहून जळफळाट झालेल्या मालदीवलाही भारतीय सेलिब्रिटी, क्रिकेटर्स आणि इन्फ्लुएन्सर्सनी चांगलंच सुनावलं. त्यानंतर, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही काही फोटो शेअर करत महाराष्ट्रातील निसर्ग सौंदर्याचं दर्शन घडवलं आहे. 

मालदीव वादानंतर क्रिकेट जगतातील दिगज्ज सचिन तेंडुलकरने एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सिंधुदुर्गातील आठवणींना उजाळा देत पर्यटनासाठी सिंधुदुर्गासह भारतातील सुंदर किनारे आणि समुद्री बेटांकडे वळण्याचे आवाहन केले आहे. सचिनने म्हटले आहे की अतिथी देवो भव हे भारतीयांचे तत्वज्ञान आहे. सचिनसह बॉलीवूड स्टार अक्षय कुमार, सलमान खान, जॉन अब्राहम, श्रद्धा कपूर आदी सेलिब्रेटींनी लक्षद्वीप, अंदमान आणि सिंधुदुर्ग सारख्या भारतीय समुद्री बेटांकडे वळण्याचे लोकांना आवाहन केले आहे. त्यामुळे, मालदीवला मोठी चपराक भारतातील दिग्गजांनी दिली. त्यानंतर, मालदीव सरकार नरमलं असून त्यांनी अपप्रचाराबद्दल खेदही व्यक्त केला. मात्र, मोदींच्या एका डुबकीमुळे देशासह महाराष्ट्रातील निसर्ग व सागरी सौदर्य समोर आलं आहे. 

देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन समुद्र सौंदर्याचे फोटो शेअर केले आहेत. हे आमच्या महाराष्ट्रातील आहेत, हा आमचा कोकण आहे, असे म्हणत फडणवीसांनी कोकणाचं सौंदर्य मालदीवला दाखवण्याचा प्रयत्न केलाय. आपल्या पोस्टमध्येही त्यांनी मालदीवचा उल्लेख करत, हे मालदीव नसून महाराष्ट्राला लाभलेलं आमचं सुंदर असं कोकण आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तारकर्ली, मालवण, आचरा, निवती, भोगवे हे समुद्रकिनारे आकर्षणाचे केंद्रबिंदू आहेत. कोकणातील या निसर्गसंपदेची छायाचित्रे शेअर करत फडणवीसांनीही मोदींच्या पाऊलावर पाऊल टाकण्याचा प्रयत्न केला. मोदींनी लक्षद्वीपचं पर्यटन जगाला दाखवलं, तर फडणवीसांनी कोकणच्या सौंदर्याची झलक जगाला दाखवून दिली.

सचिन तेंडुलकरनेही दिला आठवणींना उजाळा

सचिनने काहीं महिन्यांपूर्वी आपला ५० वा वाढदिवस आपल्या परीवारासमवेत सिंधुदुर्गातील निवती - भोगवे या किनाऱ्यावर साजरा केला होता. या आठवणींना उजाळा देताना सचिनने, सिंधुदुर्गात निवती - भोगवे बीच वरील फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत.  

टॅग्स :देवेंद्र फडणवीससागरी महामार्गसिंधुदुर्गमालदीवलक्षद्वीप