Join us

असे मिळवले जाते शरीरात लपवलेले ड्रग्ज आणि सोने

By संतोष आंधळे | Updated: March 3, 2025 11:04 IST

शरीरात लपवून कोट्यवधी रुपयांचे सोने आणि अमली पदार्थ लपवून परदेशी महिला आणि पुरुषांना मुंबई विमानतळावर अटक करण्याच्या बातम्या सातत्याने येत असतात.

निमित्त, संतोष आंधळे, विशेष प्रतिनिधी

शरीरात लपवून कोट्यवधी रुपयांचे सोने आणि अमली पदार्थ लपवून परदेशी महिला आणि पुरुषांना मुंबई विमानतळावर अटक करण्याच्या बातम्या सातत्याने येत असतात. पकडलेल्या या आरोपींकडून तस्करीचा मुद्देमाल हस्तगत करण्यासाठी त्यांना जे जे रुग्णालयातील जनरल सर्जरी विभागात दाखल केले जाते. त्यानंतर त्या विभागातील डॉक्टर वैद्यकीय उपचाराच्या साहाय्याने या आरोपींनी शरीरात लपविलेला सर्व ऐवज हस्तगत करून कस्टम  अधिकाऱ्यांकडे देतात. या आरोपींना वैद्यकीय भाषेत ‘बॉडी पॅकर्स’ असे म्हणतात.

अमली पदार्थांची तस्करी करणारे विविध क्लृप्त्या करतात. त्यातलीच एक युक्ती म्हणजे शरीरात कॅप्सूल लपविणे. काही महाभाग तर चक्क अमली पदार्थाच्या कॅप्सूल तयार करून त्या गिळतात. काही प्रकरणांत तर महिलांनी निरोधचा वापर करत अमली पदार्थांच्या कॅप्सूल योनीमार्गात ठेवल्याचे प्रकारही आढळून आले आहेत. कॅप्सूल पार्श्वभागातही ठेवल्या जातात. 

दरवर्षी असे ८-१० आरोपी जे जे रुग्णालयात आणले जातात. अमली पदार्थाच्या हजारो कॅप्सूल्स रुग्णालयाच्या डॉक्टरांनी आतापर्यंत काढल्या आहेत. त्याची किंमत कोट्यवधींच्या घरात असल्याचे सांगण्यात येत आहे. आरोपीला रुग्णालयात दाखल केल्यानंतर डिस्चार्ज होईपर्यंत पोलिसांचा एक माणूस रात्र- दिवस वॉर्डमध्ये असतो. तीन ते चार दिवसांत हा ऐवज आरोपीकडून हस्तगत केला जातो.

रुग्णालयात भरती, डॉक्टरांचे लक्ष  आणि त्यानंतर...

कस्टमचे अधिकारी विमानतळावर पकडलेल्या तस्कराला रुग्णालयात आणतात. तिथे त्याच्या वैद्यकीय चाचण्या केल्या जातात.

तस्कराचे प्रथमत: एक्स-रे आणि सीटीस्कॅन केले जाते. त्यात कॅप्सूल कुठे लपविल्या आहेत, हे स्पष्ट होते. 

डॉक्टर आरोपीची सर्जरी करण्याऐवजी त्याला एक ते दोन दिवस हाय फायर डाएट देतात, तसेच केळी खाण्यास देतात. 

आरोपीने गोळ्या गिळल्या असतील तर त्याला पचनसंस्थेशी निगडित औषधे देऊन नैसर्गिक विधीद्वारे त्या कॅप्सूल्स काढल्या जातात.

नैसर्गिक विधीमार्फत आरोपीने पोटात लपविलेल्या कॅप्सूल प्राप्त केल्या जातात. एखादी कॅप्सूल अडकली, तर मात्र सर्जरीचा विचार केला जातो.

सर्व कॅप्सूल उपस्थित अधिकाऱ्यासमोर मोजून सुपूर्द केले जातात. त्यासाठीची असणारी कायदेशीर प्रक्रिया पार पडली जाते. त्यानंतर पोटातील किंवा शरीरातील सर्व गोष्टी निघाल्या आहेत की नाही, हे पाहण्यासाठी  पुन्हा सीटीस्कॅन काढला जातो.  त्यानंतर आरोपीला डिस्चार्ज दिला जातो.

टॅग्स :अमली पदार्थगुन्हेगारी