थर्टीफर्स्टचा फिव्हर चढला !
By Admin | Updated: December 29, 2014 02:56 IST2014-12-29T02:56:14+5:302014-12-29T02:56:14+5:30
मुंबईत गुलाबी थंडीचा रंग चढू लागला असताना थर्टीफर्स्टआधी आलेल्या संडेला पर्यटकांनी मुंबईतील चौपाट्या, मॉल आणि हॉटेलमध्ये तौबा गर्दी केली होती

थर्टीफर्स्टचा फिव्हर चढला !
मुंबई : मुंबईत गुलाबी थंडीचा रंग चढू लागला असताना थर्टीफर्स्टआधी आलेल्या संडेला पर्यटकांनी मुंबईतील चौपाट्या, मॉल आणि हॉटेलमध्ये तौबा गर्दी केली होती. त्यामुळे मुंबईत जणूकाही थर्टीफर्स्टची रंगीत तालीम सुरू असल्याचे चित्र रविवारी पाहायला मिळाले.
ख्रिसमसपासून थर्टीफर्स्टपर्यंत मुंबईतील मॉल, हॉटेल, पब आणि डिस्को थेकमध्ये विविध आॅफर्सचा मारा सुरू आहे. त्याचा फायदा उचलत लोकांनी शॉपिंगसाठी मॉलमध्ये गर्दी केली होती. तर खवय्यांनीही आॅफर्सचा पुरेपूर फायदा लाटत रविवारी चौपाट्यांवरील चॅटनंतर जीभेचे चोचले पुरवण्यासाठी हॉटेलमध्ये गर्दी केली होती. यंग जनरेशन तर जणूकाही थर्टीफर्स्टची रंगीत तालीम असल्याप्रमाणे पब आणि डिस्को थेकमध्ये थिरकताना दिसली. थर्टीफर्स्टला मुंबईतील वातावरण कसे असेल, याची प्रचिती पोलीस प्रशासनाला मुंबईकरांचा संडे मूड पाहून नक्कीच आली असेल.
शहरात थर्टीफर्स्टसाठी येणाऱ्या पर्यटकांचे स्वागत करत जिल्हाधिकारी कार्यालयाने शेवटच्या तीन दिवसांत कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असल्याने प्रशासनाला कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली. शिवाय पर्यटकांनी थर्टीफर्स्टची मजा लुटताना कोणत्याही स्थानिक किंवा अन्य नागरिकांना त्रास होणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.