थर्टी फर्स्टच्या धूमसाठी सजले आहे केळवे !
By Admin | Updated: December 28, 2014 23:29 IST2014-12-28T23:29:34+5:302014-12-28T23:29:34+5:30
भरघोस निसर्गाने नटलेल्या, ऐतिहासिक, धार्मिक पर्यटनस्थळांचा समावेश असलेल्या पालघर जिल्ह्यातील केळवा या प्रसिद्ध पर्यटनस्थळाला

थर्टी फर्स्टच्या धूमसाठी सजले आहे केळवे !
पालघर : भरघोस निसर्गाने नटलेल्या, ऐतिहासिक, धार्मिक पर्यटनस्थळांचा समावेश असलेल्या पालघर जिल्ह्यातील केळवा या प्रसिद्ध पर्यटनस्थळाला मुंबई, नाशिक, गुजरात, केरळ येथील पर्यटक भेटी देत एन्जॉयमेंट करीत आहेत. थर्टी फर्स्टची धूम साजरी करण्यासाठीही १० दिवसांपूर्वीपासूनच मोठ्या प्रमाणात पर्यटकांनी आपली नोंदणीही सुरू केली आहे.
महाराष्ट्र राज्याची आर्थिक राजधानी समजल्या जाणाऱ्या मुंबईपासून अवघ्या १०० किमीवर असलेले केळवे हे पर्यटनस्थळ पर्यटकांचे आवडते ठिकाण बनत असून निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केलेली हिरवाई, स्वच्छ, धोकादायक नसलेला समुद्रकिनारा, पुरातन शीतलाई मातेचे मंदिर, ऐतिहासिक भुईकोट, पाणकोळ किल्ले, इ. मळे यामुळे दिवसेंदिवस मुंबई, नाशिक, गुजरात, केरळ इ. भागातील पर्यटक केळव्याकडे आकर्षित होत आहेत. इथला पर्यटन व्यवसायही आता अॅग्रो टुरिझमकडे वळू लागला आहे. पूर्वी केळव्यामध्ये पुरेशा सुविधा नसल्याने नाराजी व्यक्त करणाऱ्या पर्यटकांची नाराजी आता दूर झाली असून शासनाने केळव्याच्या पर्यटन विकासासाठी ४ कोटी ४८ लाखांचा निधी मंजूर केल्याने चकाचक रस्ते, शौचालये, पार्किंग व्यवस्था, स्टॉल्स इ. सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत.
केळवा-माहीममधील कृषी व मच्छीमारी व्यवसाय आता परवडेनासा झाला असल्याने इथला स्थानिक बागायतदार, मच्छीमार पर्यटनाशी निगडित व्यवसायाकडे वळू लागला आहे. स्थानिक व्यवसायाशी निगडित खाद्यपदार्थ देताना स्थानिक भाजीपाला, सुके-ओले मासे इ. माध्यमातून पारंपरिक खाद्यपदार्थांद्वारे पर्यटकांना जोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. इथे आलेल्या पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी पालघरचे जिल्हाधिकारी अभिजित बांगर आणि जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी संपूर्ण पालघर जिल्ह्याच्या पर्यटन विकासाचा एक प्रस्ताव नुकताच राज्यपालांकडे सादर केला आहे. त्यामुळे भविष्यात पालघर जिल्ह्यात पर्यटनाला सुगीचे दिवस येणार असून केळवा हे पर्यटनस्थळातील एक मॉडेल बनविण्याच्या दृष्टीने ठोस पावले उचलली जात आहेत.
(वार्ताहर)