पालघरमधील तेरा इमारती धोकादायक
By Admin | Updated: June 20, 2015 22:44 IST2015-06-20T22:44:57+5:302015-06-20T22:44:57+5:30
पालघर नगरपरिषदेने सालाबादप्रमाणे यंदाही शहरातील तेरा इमारती धोकादायक असल्याचे जाहीर करून त्यांना नोटिसा बजावल्या आहेत.

पालघरमधील तेरा इमारती धोकादायक
पालघर : पालघर नगरपरिषदेने सालाबादप्रमाणे यंदाही शहरातील तेरा इमारती धोकादायक असल्याचे जाहीर करून त्यांना नोटिसा बजावल्या आहेत. यातील पालघर बाजारपेठेतील नॅशनल ज्वेलर्स तर्फे सागरमल जैन यांची इमारत अत्यंत धोकादायक अवस्थेत असून ही इमारत कोसळल्यास एस.टी, रिक्षांच्या प्रतिक्षेत उभ्या राहणाऱ्या प्रवाशासह बाजारहाट करण्यासाठी येणाऱ्या शेकडो लोकांच्या जिवीतास धोका निर्माण झाला आहे.
या धोकादायक इमारतींमध्ये वास्तव्य करणारे मालक, भोगवटाधारकांनी या इमारती धोकादायक असल्याने निवासी व वाणीज्य वापर तात्काळ थांबविण्याचे मुख्याधिकारी वैभव आवारेंनी कळविले आहे. या नोटिसा बजावण्याचे काम अनेक वर्षापासून नगरपरिषद करीत असून या धोकादायक इमारत कोसळून जीवीत व वित्तहानी झाल्यास मालक व भोगवटाधारकाना सर्वस्वी जबाबदार धरण्यात येऊन नगरपरिषदेने आपले हात झटकले आहेत. परंतु या तेरा धोकादायक इमारतीपैकी पाच इमारती या पालघर रेल्वे स्टेशन ते बाजारपेठ मध्येच आहेत. पालघर तालुक्याचे ठिकाण असल्याने दररोज रेल्वे प्रवास, बस, रिक्षासाठी येथे नेहमीच मोठी वर्दळ असते.
धोकादायक इमारतींची यादी -
पालघर नगरपरिषदेने १. रफिक लुलानिया, सरकारी दवाखान्याजवळ, पालघर, २. दामु पाटील चाळ , विमल जगमोहन दामनिया, पंचायत समिती जवळ, ३. अध्यक्ष झटकल विला इमारत मस्जिदच्या पाठीमागे, ४. शांतीलाल, प्रविण जैन सरकारी दवाखान्याजवळ, मोडकी चाळ, ५. जय जलाराम टी हाऊस, स्टेशन जवळ (प), नॅशनल ज्वेलर्स, सागरमल जैन स्टेशन जवळ (प), ७. नाकोडा कलेक्शन, रामचंद्र तोराणी स्टेशन जवळ (प), ८. शकुंतला शामकुमार मिश्रा, देवीशाचाळ, वजलीपाडा, ९. विजय फरसाण मार्ट, स्टेशन जवळ, १०. डॉ. एस. पी. जैन व श्याम ओसरमल, स्टेशनजवळ, ११. बिसीमतलाह कॅटरेस, अल्लाउद्दीन खान, कचेरी रोड, सरकारी दवाखाना समोर, १२. शांतीलाल जैन, ४०४ सुर्यादर्शन कार्टररोड, बोरिवली, पाटीलचाळ राज टॉकीज जवळ, टेंभोडे रोड, १३. चेअरमन/सेक्रेटरी विजय नगर सहकारी गृह निर्माण संस्था, मर्यादीत कमला पार्क या तेरा इमारती व चाळींना नोटीसा बजावल्या आहेत.