मुंबई : हिंदी आणि मराठी गाण्यांच्या तालावर थिरकरणारी पावले, शिट्या, बजरंगबलीचा जयघोष, एकमेकांच्या हातात हात देत एकमेकांना सावरत रचले जाणारे थर; आणि सरतेशेवटी सलामी देत हंडी फोडल्याचा आनंद... असे काहीसे उत्साही वातावरण मुंबापुरीत पाहायला मिळाले. औचित्य होते ते दहीहंडीचे. सोमवारी सकाळपासून मुंबई शहर आणि उपनगरातल्या हंड्या उंच आकाशाशी स्पर्धा करताना दिसल्या. त्या फोडण्यासाठी गोविंदा पथकांनी थरावर थर रचले. सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत ठिकठिकाणी सलामी देत फोडण्यात आलेल्या हंड्यांमुळे रात्री उशिरापर्यंत मुंबईकरांत उत्सवाचा उत्साह पाहायला मिळाला.सोमवारी सकाळपासूनच मुंबई शहर आणि उपनगरातील गोविंदा पथके आपआपल्या मंडळाची हंडी फोडून उर्वरित हंड्या फोडण्यासाठी मार्गक्रमण करू लागली. ट्रक, टेम्पो आणि दुचाकीहून गोविंदा हंडीच्या ठिकाणी दाखल होत होते. तेथे थरावर थर रचत हंड्या फोडल्या जात होत्या. बोरीवली, घाटकोपर, दादर, चेंबूर, वरळी आणि इतर परिसरात हंड्या फोडण्यासाठी दाखल झालेल्या गोविंदांच्या उत्साहात भर घालण्यासाठी हिंदी, मराठी गाण्यांची रेलचेल सुरू होती. चित्रपट क्षेत्रातील कलाकारांनी व्यासपीठावर दाखल होत गोविंदांच्या उत्साहात भर घातली. सकाळपासून सुरू झालेला हा उत्साह रात्री उशिरापर्यंत कायम होता.दहीकाल्याकडे संस्कृती आणि परंपरा जपणारा उत्सव म्हणून पाहिले जात असले, तरी या उत्सवात राजकीय पक्षांचा उत्साह भरभरून वाहत असल्याचे पाहायला मिळाले. दहीहंड्यांच्या परिसरात राजकीय पक्षांचे शक्तिप्रदर्शन सुरू असल्याचे चित्र होते. काही आयोजकांनी सकाळपासून नव्हे; तर दुपारपासून रात्रीपर्यंत दहीहंडीचा उत्सव ‘सेलिब्रेट’ होईल, असा ‘पण’ केला होता. सकाळी हंड्या बांधून त्या दुपारपर्यंत फोडण्याच्या प्रथेला यंदाही हरताळ फासण्यात आला आणि रात्रीपर्यंत दहीहंडीचा ‘इव्हेंट’ साजरा करण्यात यंदाही धन्यता मानत, अनेकांनी स्वत:ची पाठ स्वत:च थोपटूनघेतली.पाण्याच्या फवाऱ्यामध्येच भागवली भिजण्याची तहान : सोमवारी दिवसभर पावसाने मुंबई शहरासह उपनगराकडे पाठ फिरविल्याने गोविंदांनीही पाण्याच्या फवाºयामध्येच भिजण्याची तहान भागविली.काही मंडळांनी बक्षिसांच्या रकमेत कपात करत, संबंधित रक्कम केरळमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी वापरण्याची घोषणा करत सामाजिक बांधिलकी जपली.हंडी फोडण्यासाठी १४ वर्षांवरील गोविंदांची निवड, हंडी फोडणाºया गोविंदाला सेफ्टी हेल्मेट-जॅकेट- सुरक्षेचा दोर अशा विविध सुरक्षा साधनांना आयोजकांसह गोविंदा पथकांनी प्राधान्य दिले.
गोविंदांसोबत थिरकली मुंबापुरी ; राजकीय पक्षांचा ‘इव्हेंट’ साजरा करण्याकडे कल
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2018 03:13 IST