Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई-पुणेदरम्यान तिसरी मार्गिका १५ जानेवारीला होणार खुली

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2019 03:57 IST

मध्य रेल्वे प्रशासनाची माहिती; घाट भागातील काम युद्धपातळीवर सुरू

मुंबई : मागील दोन महिन्यांपासून पूर्णपणे बंद असलेली मुंबई-पुणे तिसरी मार्गिका १५ जानेवारीला खुली करण्यात येणार आहे. परिणामी, नव्या वर्षात प्रवाशांचा मुंबई-पुणे प्रवास सुरळीत होईल, असा दावा मध्य रेल्वेने केला आहे.यंदाच्या पावसाळ्यात मंकी हिल ते नागनाथ या दोन स्थानकांच्या दरम्यान रेल्वे मार्गाचे नुकसान झाले. परिणामी, येथील मार्गिकेचा बंद-चालूचा खेळ सुरू होता. मात्र सप्टेंबर-आॅक्टोबर दरम्यान पडलेल्या मुसळधार पावसाने मंकी हिल ते नागनाथ या दोन स्टेशनमधील दक्षिण घाट परिसरातील मुंबई दिशेकडील रेल्वे मार्ग वाहून गेला. रेल्वे रुळांखालील खडी, रेती वाहून गेली. त्यामुळे ३ आॅक्टोबरपासून तिसरी मार्गिका पूर्णपणे बंद करून दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले. दोन टनेलमध्ये एकीकडे टेकडी असलेला डोंगर भाग तर दुसरीकडे दरी या दोन्हीच्या मध्यभागी असलेला रेल्वे मार्ग उभा करणे आव्हानात्मक असून, रेल्वेच्या इतिहासात पहिल्यांदाच या मार्गावर इतका मोठा ब्लॉक घेऊन कामे केली जात आहेत.सतत पडणारा पाऊस, तीव्र उतार, अत्यावश्यक सामग्री पोहोचविण्यास अडचणी अशा बाबींवर मात करून मार्गिकेचे काम सुरू आहे. यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी गर्डर उभारण्यात येत आहे. २४ तास येथे युद्धपातळीवर काम सुरू आहे. सुमारे १५० कामगारांच्या साहाय्याने घाट भागातील काम केले जात आहे. क्रेनच्या साहाय्याने गर्डर टाकण्याचे काम सुरू आहे. १५० मीटर लांबीचा मार्ग बनविला जात आहे. ८० टन स्टील सामग्री, ३५० ट्रक दगड, सुमारे १०० ट्रक सिमेंटच्या साहाय्याने गर्डर, सुरक्षा भिंत बनवली जात आहे. या सर्व कामासाठी सुमारे १० कोटी रुपयांचा खर्च येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेकडून दिली गेली.रोज ७५ गाड्या धावणारसीएसएमटी-विजापूर, सीएसएमटी-पंढरपूर पॅसेंजर एक्स्प्रेस, पुणे-पनवेल शटल सेवा पूर्णपणे बंद आहे. हैदराबाद, विशाखापट्टणम्, हुबळी, कोयना, नांदेड एक्स्प्रेसच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. १५ जानेवारीपासून मार्ग खुला झाल्यास या सर्व एक्स्प्रेससह दररोज ७५ गाड्या या मार्गावरून धावतील.माकडांमुळे रेल्वे मार्ग विस्कळीत, रेल्वेने लढवली शक्कलमंकी हिल परिसरातील माकडांमुळे रेल्वे मार्ग विस्कळीत होत होता. माकडे रेल्वे खांबांवर चढून ओव्हरहेड वायरवर पोहोचल्यास विद्युत पुरवठा खंडित होत असे. त्यामुळे सुमारे एक ते अडीच तास रेल्वे मार्गाचा खोळंबा होत असे.यावर रेल्वे प्रशासनाने खांबावर लोखंडी खिळे लावले. मात्र तरीदेखील माकडांचा सुळसुळाट सुरू होता. त्यानंतर प्रशासनाने खांबांवर ‘मंकी ट्रक’ लावले. स्टीलचे गोलाकार तबक खांबांवर लावले. त्यामुळे माकडांमुळे रेल्वे विस्कळीत होण्याचे प्रमाण कमी झाले आहे.

टॅग्स :मध्य रेल्वे