वडिलांच्या एकटेपणाचाही थोडा विचार करा
By Admin | Updated: June 19, 2016 04:08 IST2016-06-19T04:08:52+5:302016-06-19T04:08:52+5:30
घटस्फोटाच्या वाढत्या प्रमाणाचा सर्वात जास्त परिणाम हा मुलांवर आणि त्यांच्या वडिलांवर होत असतो. कारण, मुले सज्ञान नसतील तर त्यांचा ताबा आईकडे राहतो. बाबांना मुलांना भेटण्यासाठी

वडिलांच्या एकटेपणाचाही थोडा विचार करा
मुंबई : घटस्फोटाच्या वाढत्या प्रमाणाचा सर्वात जास्त परिणाम हा मुलांवर आणि त्यांच्या वडिलांवर होत असतो. कारण, मुले सज्ञान नसतील तर त्यांचा ताबा आईकडे राहतो. बाबांना मुलांना भेटण्यासाठी न्यायालयात खेटा माराव्या लागतात. तरीही ताबा मिळेल, भेट होईल याची निश्चिती नाही. त्यामुळे मुलांपासून दुरावलेल्या बाबांना ‘फादर्स डे’निमित्त न्याय मिळवून देण्यासाठी ‘वास्तव फाउंडेशन’ने स्वाक्षरी मोहिमेचे आयोजन केले होते.
पालकांपासून दुरावलेल्या मुलांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास काही अंशी खुंटतो. त्यांचे भावविश्व गढूळ होते. मुलांच्या बरोबरीनेच वडिलांचा विचार होण्याची अत्यंत गरज आहे. आपल्याकडील कायदा हा महिलांच्या बाजूने असल्यामुळे वडिलांवर अनेकदा अन्याय होतो. मुलांपासून दूर राहिल्यामुळे वडिलांचे अनेकदा मानसिक खच्चीकरण होते. त्यांचा एकटेपणा वाढल्याने त्यांना आधाराची आवश्यकता असते. पण तो आधार मिळत नाही, असे फाउंडेशनचे अध्यक्ष अमित देशपांडे यांनी सांगितले.
दर रविवारी मुलुंड आणि बोरीवली येथे आम्ही एकत्र जमतो. त्या वेळी साधारणत: ४० पुरुष आमच्या येथे येतात. यातील अनेकांना मुले दुरावल्यामुळे होणारे दु:ख व्यक्त करण्यासाठी कोणीही नसते. त्यामुळे त्यांना अधिकच एकाकीपणा आलेला असतो. आमच्याशी बोलून ते मोकळे होतात. आम्ही त्यांना आधार देण्याचे काम करतो. प्रत्यक्षात त्यांना हवे असणारे प्रेम हे त्यांना मुलांकडूनच मिळू शकते. त्यामुळे वडिलांनाही मुलांचा हक्क द्या, अशी मागणी फादर्स डेनिमित्त करत असल्याचे देशपांडे यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
- देशात विभक्त होण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. सध्याच्या कायद्यानुसार मुले सज्ञान होईपर्यंत आईकडेच राहतात. बाबांबरोबर राहण्यास त्यांना सहज परवानगी मिळत नाही. पण मुलांना आई-बाबा दोघांचे प्रेम मिळण्याचा, दोघांबरोबर राहण्याचा हक्क असतो. त्यामुळे भारतीय कौटुंबिक कायद्यात पुढील सुधारणा कराव्यात, अशी मागणी वास्तव फाउंडेशनने केली आहे.
जेथे पालक परस्पर विभक्त झाले आहेत, तेथे मुलांना भेटण्याचा आणि मुलांबरोबर राहण्याचा समान अधिकार असावा. ‘शेअर पेरेंटिंग’ अनिवार्य करावे.
अशा प्रकारच्या सर्व प्रकरणांत ६ महिन्यांच्या आत निकाल देण्यासाठी कायदे आणावेत.
जगभरातील विविध संस्थांनी केलेल्या संशोधनातून वडिलांच्या प्रेमापासून वंचित राहणाऱ्या मुलांवर असे परिणाम झाल्याचे दिसून आले आहे.
आत्महत्या करण्यास प्रवृत्त होण्याची शक्यता ५ पटीने जास्त, शाळा सोडण्याची शक्यता ९ पटीने जास्त, बलात्कारी वृत्ती असणे १४ पट जास्त शक्यता, व्यसनाधीन होण्याचे प्रमाण २० वेळा अधिक असते, घरातून पळून जाण्याची शक्यता ३२ पट अधिक असते