मुंबई : महागड्या वाहनातून फिरण्याच्या हौसेपोटी उच्चशिक्षित जोडपे चोर बनल्याचा प्रकार दादर परिसरात उघडकीस आला आहे. शिवाजी पार्क पोलिसांनी या जोडप्याचा पर्दाफाश करीत दोघांनाही अटक केली आहे.तसनीम इब्राहिम रूपावाला (३८) आणि पारस चोथानी (३३) अशी अटक आरोपींची नावे आहेत. तसनीम ही विवाहित असून, तिला दोन मुले आहेत. ती सांताक्रुझ पश्चिम येथील एका उच्चभ्रू सोसायटीत पती आणि मुलांसह राहते. तसनीमचे शिक्षण बीएससीपर्यंत झाले आहे. ती एका परीक्षा केंद्रावर पर्यवेक्षक म्हणून काम पाहते. पारसचा स्वत:चा वेब डिझायनिंचा व्यवसाय आहे.महागड्या गाड्यांतून फिरण्याच्या हौसेपोटी त्यांनी रस्त्याच्या कडेला उभ्या केलेल्या वाहनांना टार्गेट करण्यास सुरुवात केली. अनेक दिवस धूळखात पडलेल्या वाहनांना हेरून त्यांनी चोरी करण्याचे ठरविले. बनावट चावीच्या आधारे ते वाहन चोरी करायचे. चोरी केलेली वाहने घरापासून काही अंतरावर पार्क करत ते वाटेल तेव्हा फेरफटका मारत असल्याची माहिती पोलीस तपासात उघडकीस आली आहे. त्यांच्याकडून इनोव्हा, बुलेट, कार जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी दोघांकडेही अधिक तपास सुरू आहे.
महागड्या वाहनांतून फिरण्यासाठी उच्चशिक्षित जोडपे बनले चोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2019 06:08 IST