बॅग चोरणाऱ्याला वांद्रेतून अटक, बॅगेत होता चार लाखांचा ऐवज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2020 23:33 IST2020-03-04T23:32:58+5:302020-03-04T23:33:01+5:30
चार लाखांच्या दागिन्यांचा समावेश असलेली महिलेची बॅग जवळपास दीड महिन्यापूर्वी बोरीवली परिसरातून चोरी करण्यात आली होती.

बॅग चोरणाऱ्याला वांद्रेतून अटक, बॅगेत होता चार लाखांचा ऐवज
मुंबई : चार लाखांच्या दागिन्यांचा समावेश असलेली महिलेची बॅग जवळपास दीड महिन्यापूर्वी बोरीवली परिसरातून चोरी करण्यात आली होती. ही बॅग पूर्ण मुद्देमालासह परत मिळविण्यात बोरीवली लोहमार्ग पोलिसांना मंगळवारी यश मिळाले.
जयरुबी नाडर (५१) असे तक्रारदार महिलेचे नाव असून त्या गोरेगाव परिसरात राहतात. गेल्या महिन्यात नाडर या त्यांच्या एका नातेवाइकाच्या लग्न सोहळ्यात सहभागी होण्यासाठी वसईला गेल्या होत्या. रात्री उशिरा परतत असताना गोरेगावला जाण्यासाठी बोरीवलीवरून लोकल पकडण्यासाठी त्या उतरल्या. लोकल आल्यानंतर गडबडीत त्या चढल्या; मात्र ४ लाख ७ हजार रुपयांचे दागिने असलेली बॅग प्लॅटफॉर्मवरच विसरल्या. ही बाब त्यांच्या लक्षात आल्यावर त्या कांदिवलीला उतरल्या आणि पुन्हा लोकलने बोरीवलीच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ५वर जाऊन त्यांनी दागिन्यांची बॅग शोधली. मात्र त्यांना ती कुठेच सापडली नाही. अखेर या प्रकरणी त्यांनी बोरीवली रेल्वे पोलिसांकडे तक्रार दाखल केली.
पोलिसांनी त्या वेळचे सीसीटीव्ही कॅमेरे पडताळून पाहिले. तेव्हा एक इसम ती बॅग घेऊन जात असल्याचे त्यांना दिसले. त्या इसमाची ओळख पटल्यानंतर वांद्रे परिसरातून त्याला अटक करण्यात आली. मोहम्मद सिद्दिकी दिन मोहम्मद असे या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या इसमाचे नाव असून तो व्यवसायाने टेलर आहे. अनोळखी बॅग सापडल्याचे पोलिसांना न कळविता स्वत:च्या घरी घेऊन गेल्याबद्दल त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाडर यांची चोरीला गेलेली सर्व मालमत्ता हस्तगत करण्यात यश आल्याचे बोरीवली लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर पवार यांनी सांगितले.
>असा घेतला शोध!
तक्रारदार महिलेला प्लॅटफॉर्मवर बॅग विसरल्याचे लक्षात येतात शोध घेतला, पण ती न सापडल्याने तिने पोलिसांत तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी स्थानकात असलेल्या सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीला अटक केली.