किरकोळ घटना करताहेत ‘त्यांना’आत्महत्येला प्रवृत्त

By Admin | Updated: September 10, 2015 12:32 IST2015-09-10T04:06:55+5:302015-09-10T12:32:11+5:30

‘तुला काहीच काम जमत नाही,’ ‘तू आमच्यात नकोस’, ‘तुला अभ्यास करायला नको’, ‘तुला जबाबदारी सांभाळता येणार नाही...’ ही वाक्ये नेहमीच ऐकायला मिळतात. वरकरणी ही वाक्ये

They're having a retail incident 'motivated' to suicide | किरकोळ घटना करताहेत ‘त्यांना’आत्महत्येला प्रवृत्त

किरकोळ घटना करताहेत ‘त्यांना’आत्महत्येला प्रवृत्त

- पूजा दामले,  मुंबई
‘तुला काहीच काम जमत नाही,’ ‘तू आमच्यात नकोस’, ‘तुला अभ्यास करायला नको’, ‘तुला जबाबदारी सांभाळता येणार नाही...’ ही वाक्ये नेहमीच ऐकायला मिळतात. वरकरणी ही वाक्ये सामान्य वाटतात. पण मानसिक ताणाखाली असलेल्या व्यक्तींना ही वाक्ये थेट आत्महत्येस प्रवृत्त करत असल्याचे चिंताजनक चित्र समोर आले आहे. आत्महत्या प्रतिबंध हेल्पलाइनवर महिन्याकाठी सुमारे १५० ते २०० कॉल्स येतात. तर मानसिक आरोग्याच्या हेल्पलाइनवर सहा महिन्यांत साडेचार हजार कॉल्सची नोंद झाली आहे. ही आकडेवारी धोक्याची घंटा असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.
दैनंदिन आयुष्यातील ताण व्यक्ती एका मर्यादेपर्यंत सहन करू शकतात. पण एक दिवशी त्यांची सहनशक्ती संपते आणि या भावना मग भयंकर रूप धारण करतात. त्यातूनच व्यक्ती आत्महत्येसाठी प्रवृत्त होते. वाढत चाललेला मानसिक ताण अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त करत आहे. कनेक्टिंग स्वयंसेवी संस्था आत्महत्येला प्रतिबंध करण्यासाठी एक हेल्पलाइन चालवते. या हेल्पलाइनवर दरमहा येणाऱ्या कॉल्सपैकी बहुतांश कॉल्स हे कौटुंबिक समस्या-कलह, नोकरीतील समस्या, मानसिक तणाव सहन न होणे या प्रकारातील असतात. सरकारने सहा महिन्यांपूर्वी सुरू केलेल्या मानसिक आरोग्यविषयक हेल्पलाइनवर आतापर्यंत एकूण ४ हजार ५१७ कॉल्स आले आहेत. यापैकी ७८ कॉल्स हे आत्महत्या करावीशी वाटते म्हणून आधार मिळावा, यासाठी करण्यात आले होते. तर मानसिक ताणतणाव, अग्नझायटी, झोप न लागणे यासाठी तब्बल १ हजार ४९५ कॉल्स रेकॉर्ड झाले आहे.
गेल्या काही वर्षांत देशात आत्महत्यांचे प्रमाण कमी होते. पण आता आत्महत्येचे, आत्महत्येचा प्रयत्न करण्याचे प्रमाण वाढत आहे. मुंबईत हे प्रमाण सर्वाधिक आहे. धावपळीचे आयुष्य, सतत काम, मेंदूवरचा ताण, कमी झोप, फिरायला न जाणे या सामान्य गोष्टींमुळे ताण वाढत आहे. यातून बाहेर न पडता आल्याने तणावाखाली आत्महत्येचा प्रयत्न करण्याचे प्रमाण तरुणांमध्ये वाढताना दिसत आहे, असे मत जे.जे. रुग्णालयाच्या मानसोपचार विभागाचे प्रमुख डॉ. युसूफ माचिसवाला यांनी व्यक्त केले.

कौटुंबिक समस्यांमुळे त्रस्त
मुंबईत राहणारा एक विदुर मानसिक तणावाखाली होता. त्याला कौटुंबिक आणि आर्थिक अनेक समस्या होत्या. त्यांनी फोन केल्यावर त्याला समजवण्यात आले. त्याच्याबरोबर संवाद साधण्यात आला. पण, काही दिवसांनी त्याच्या मनात आत्महत्येचे विचार येऊ लागले. यावेळी त्याला परावृत्त करण्यासाठी त्याला कुटुंबातील व्यक्तींना भेटण्याचा अथवा ठाण्याच्या मनोरुग्णालयात जाण्याचा सल्ला देण्यात आला. यानंतरही त्याच्याशी फोनवरून संवाद साधला गेला. त्याचे समुपदेशन करण्यात आले. पुढच्या काही दिवसांत तो पूर्णत: आत्महत्येच्या विचारापासून परावृत्त झाला.

104
राज्य सरकारतर्फे मानसिक आजारांसाठी चालवण्यात येणारी हेल्पलाइन.

18002094353
कनेक्टिंग स्वयंसेवी संस्थेची आत्महत्या प्रतिबंध हेल्पलाइन

नवीन लग्न झालेल्या मुलीला घरच्यांनी नावे ठेवणे, छोटे घर, कार्यालयात न पटणे अशा लहानसहान गोष्टींचा अनेकांच्या मनावर परिणाम होतो. यातून बाहेर पडू न शकल्याने अनेक जण आत्महत्येचा प्रयत्न करतात. या गोष्टी रोखता येणे शक्य आहे.
- डॉ. शुभांगी पारकर,
विभागप्रमुख, मानसोपचार विभाग, केईएम रुग्णालय

Web Title: They're having a retail incident 'motivated' to suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.