Join us

‘ते’ पोलीसही रडारवर! बकरी ईदसाठी विशेष दक्षता,  व्यापा-यांना त्रास देणा-यांचे होणार तत्काळ निलंबन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2017 01:39 IST

बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर पशू व्यापारी व मुस्लीम बांधवांना कथित गोरक्षकांकडून होणा-या त्रासाबाबत योग्य खबरदारी घेतानाच, या प्रकरणी बंदोबस्तावरील पोलीसही महासंचालकांच्या रडारवर राहणार आहेत.

- जमीर काझी।मुंबई : बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर पशू व्यापारी व मुस्लीम बांधवांना कथित गोरक्षकांकडून होणा-या त्रासाबाबत योग्य खबरदारी घेतानाच, या प्रकरणी बंदोबस्तावरील पोलीसही महासंचालकांच्या रडारवर राहणार आहेत. व्यापा-यांना दमदाटी करून पैसे उकळणा-याचा प्रयत्न करणा-या अधिका-यांना, तत्काळ निलंबित करण्याचे आदेश पोलीस महासंचालक सतीश माथुर यांनी राज्यातील सर्व आयुक्त व अधीक्षकांना दिले आहेत. त्याचप्रमाणे, गोमांसाबाबत स्वत: व्यापा-यांवर कारवाई न करता, त्याबाबत पहिल्यांदा पोलिसांना माहिती द्यावयाची आहे. त्यांनी कायदा हातात घेतल्यास, त्यांच्यावर कडक कारवाई केली जाणार आहे.कथित गोरक्षकांकडून होणा-या हल्ल्याबाबत न्यायालयाने चिंता व्यक्त करीत, त्याबाबत कडक कारवाईचे आदेश राज्य सरकारला दिले आहेत. त्याचबरोबर, गणेशोत्सव येत असल्याने, या दोन्ही उत्सवांच्या पार्श्वभूमीवर महासंचालक माथुर व अपर महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) बिपिन बिहारी यांनी गुरुवारी बंदोबस्ताबाबत परिपत्रक जाहीर केले आहे. त्यामध्ये तीन राज्यांच्या सीमा भागातून जनावरांची आयात होत असल्याने, या ठिकाणच्या विविध मार्गांवर २७ तपासणी नाके बनविण्यात आले आहेत. त्याशिवाय पोलिसांनी जनावरांचा बाजार होणारे ठिकाण, अधिकृत कत्तलखाने या ठिकाणी विशेष बंदोबस्त नेमण्यात येणार असून, या ठिकाणी येणाºया जनावरांचे व्हिडीओ रेकॉर्डिंग केले जाणार आहे.बाप्पांच्या भक्तांसाठी पोलीस सज्जसंपूर्ण राज्यासह मुंबईत मोठ्या उत्साहात साजरा होत असलेला गणेशोत्सव, बकरी ईद निर्विघ्न पार पाडण्यासाठी मुंबई पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. ड्रोन आणि सीसीटीव्हीच्या सहाय्याने संपूर्ण शहरावर नजर ठेवली जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर बुधवारी पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर, कायदा व सुव्यवस्थेचे सहआयुक्त देवेन भारती यांनी पोलीस अधिकारी, कर्मचाºयांसह गिरगाव चौपाटीसह अन्य संवेदनशील ठिकाणांची पाहणी केली. गणेशोत्सवादरम्यान नियमांचे पालन करण्यासाठी पोलिसांकडून गणेशोत्सव मंडळांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. बाप्पाच्या आगमनाच्या दिवशी शहरातील कायदा व सुव्यवस्था सांभाळण्यासोबतच, मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी मुंबई पोलीस दलातील ३५ हजार अधिकारी आणि जवानांच्या दिमतीला केंद्रीय व राज्य राखीव बलाच्या तुकड्या तैनात ठेवण्यात येणार आहेत, तसेच राज्य दहशतवादविरोधी दल, बॉम्बशोधक व नाशक पथक, शीघ्रकृती दल, फोर्सवन आणि सिव्हिल डिफेन्स तैनात असेल.सुरक्षेचा आढावा अपर महासंचालकांकडूनगणेशोत्सव, बकरी ईदनिमित्त राज्यातील कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी विभागनिहाय अप्पर महासंचालकावर सोपविली असून ते सुरक्षेचा आढावा घेतील.बकरी ईदनिमित्त मध्य प्रदेश, गुजरात व तेलंगणा या ठिकाणांहून महाराष्टÑात मोठ्या प्रमाणात जनावारांची आयात होणार असल्याने, या राज्याच्या सीमा भागावर तब्बल २७ तपासणी नाके (चेकपोस्ट) बनविण्यात आलेले आहेत.अमरावती महामार्गावर ८, यवतमाळ व बुलडाणा, जळगाव या ठिकाणी प्रत्येकी चार चेकनाके आहेत.गोरक्षकांनी कायदा हातात न घेता, त्यांच्याकडील माहिती नजीकच्या पोलिसांना द्यावी, त्याबाबत तत्काळ कार्यवाही केली जाईल. मात्र, त्यांनी स्वत:हून शांतता बिघडवून कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न केल्यास, त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल.- सतीश माथुर( पोलीस महासंचालक)

टॅग्स :पोलिस