४० वर्षांनी ‘त्या’ भेटल्या... डोळ्यातील अश्रूच बनले शब्द; ‘ती’ नॉर्वेची, आई झोपडपट्टीत राहणारी

By मनीषा म्हात्रे | Published: January 3, 2024 01:28 PM2024-01-03T13:28:28+5:302024-01-03T13:32:03+5:30

मूळच्या पुण्याची असलेल्या तरुणीचा १९८४ मध्ये जन्म झाला. अवघ्या वर्षभरातच पुण्याच्या संस्थेतून नॉर्वेच्या कुटुंबीयांनी तिला दत्तक घेतले. १५ वर्षांपासून तेथील परदेशी मंत्रालयासोबत पत्रव्यवहार करून तिने आईचा शोध घेण्यास सुरुवात केली.

'They' met after 40 years Tears in eyes became words; 'She' is from Norway, the mother lives in a slum area | ४० वर्षांनी ‘त्या’ भेटल्या... डोळ्यातील अश्रूच बनले शब्द; ‘ती’ नॉर्वेची, आई झोपडपट्टीत राहणारी

४० वर्षांनी ‘त्या’ भेटल्या... डोळ्यातील अश्रूच बनले शब्द; ‘ती’ नॉर्वेची, आई झोपडपट्टीत राहणारी

मुंबई : ४० वर्षांपूर्वी दुरावलेल्या मायलेकी एकमेकांसमोर आल्या आणि अश्रूंचा बांध फुटला. ‘ती’ नॉर्वेची तर, आई पुण्याच्या एका झोपडपट्टीत राहणारी. दोघीही एकमेकींना भेटल्या; पण, भाषा समजत नसल्याने डोळ्यांतील अश्रूच शब्द बनल्याचे दिसून आले. दोघीही अधूनमधून एकमेकींची विचारपूस करीत असतात. 

मूळच्या पुण्याची असलेल्या तरुणीचा १९८४ मध्ये जन्म झाला. अवघ्या वर्षभरातच पुण्याच्या संस्थेतून नॉर्वेच्या कुटुंबीयांनी तिला दत्तक घेतले. १५ वर्षांपासून तेथील परदेशी मंत्रालयासोबत पत्रव्यवहार करून तिने आईचा शोध घेण्यास सुरुवात केली. २०१७ मध्ये पुण्याच्या ॲडॉप्टी राईट्स काऊन्सिल संस्थेच्या मदतीने शोध सुरू झाला. आईचे नाव आणि पत्ता मिळाला. तो संपूर्ण झोपडपट्टी विभाग. अविवाहित असताना प्रेम प्रकरणातून फसवणूक होत जन्माला आली म्हणून आईने तिला संस्थेत सोडले होते.

फक्त पहिलं नाव आणि पत्त्यावरून आईचा शोध घेणे आव्हानात्मक होते. झोपडपट्टी विभागातील समस्या जाणून घेण्याच्या बहाण्याने संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सारी घरे पिंजून काढली. अखेर महिनाभराच्या मेहनतीनंतर ‘ते’ घर सापडले. मात्र, सध्या आईचे आयुष्य बदलले होते. लग्नानंतर तीही संसारात होती. मुलीबाबत समजताच त्यांनाही धक्का बसला. त्यांनी डीएनए दिला. डीएनए जुळताच या महिन्यात पहिल्यांदा एका मंदिरात भेट ठरली.

गेल्या १५ वर्षांपासून जिचा शोध सुरू होता ती समोर होती. आपली मुलगी पाहून तिनेही मिठी मारली, आशीर्वाद दिला. तिच्यासाठी आणलेली पर्स गिफ्ट केली. एकमेकींची भाषा कळत नसली तरी मायेच्या ओलाव्यात दोघी एकरूप झाल्या होत्या. दोघीही फक्त एकमेकींना एक टक बघत होत्या. या भावना शब्दांत सांगू शकत नाही, असे या तरुणीने सांगितले.

आजही अनेक मुली आई-वडिलांच्या शोधात
ती सध्या नॉर्वेत आहे. डोळ्यांत फक्त आनंदाश्रू होते. आई ५९ वर्षांची. आईलाही आता नातवंडं आहेत. ४० वर्षांनी मुलीची भेट झाली. आजही अशा अनेक मुली आई-वडिलांच्या शोधात मुंबईसह राज्यभरात वाटा धुंडाळत आहेत. कुठे हॅपी एण्डिंग तर कुठे भेटीसाठी धडपड सुरू आहे. 

पदरात खोचलेली हजाराची नोट ...
- स्वीडनची ४४ वर्षीय लुईस. १९७९ मध्ये स्वीडनच्या दाम्पत्याने पुण्याच्या संस्थेतून दत्तक घेतले. शिक्षण घेत एका बड्या कंपनीत नोकरीला आहे. २०१८ मध्ये तिने संस्थेच्या माध्यमातून कुटुंबीयांचा शोध सुरू केला. 

- संस्थेने आईचा शोध घेत तिला याबाबत सांगताच त्यांनीही हंबरडा फोडला. आई बहिणीच्या मुलांना सांभाळण्यासाठी गेली. मात्र, बहिणीच्या नवऱ्याची वाईट नजर पडली. त्याच्या अत्याचारातून लुईसचा जन्म झाला होता. या प्रकारानंतर बहिणीने तिला घराबाहेर काढले. आईने परिस्थिती आणि समाजाच्या भीतीने मुलीला संस्थेत सोडले. त्यानंतर तिचा विवाह झाला. सध्या त्यांना एक मुलगा आणि मुलगी आहे. मुलगा शिक्षक तर मुलीचे लग्न झाले आहे. धुणीभांडी, कष्टातच त्यांचे आयुष्य गेले.

- दुसरीकडे लुईस मात्र लाड-कौतुकात वाढली. मुलीच्या काळजीने त्यांनाही भेटीची ओढ लागली. मात्र, तिला घरी नेऊ शकत नाही, याचे दुःख त्यांना होते. संस्थेच्या कार्यालयातच त्यांची भेट घडली. दोघीही भावुक झाल्या होत्या. लुईसने आईला चॉकलेट, साडी घेतली. आईनेही पदरात खोचलेले हजार रुपये काढून लुईसच्या मुलांना कपडे घेण्यासाठी दिले. त्यानंतर दोन वेळा तिने आईची भेट घेतली.
 

Web Title: 'They' met after 40 years Tears in eyes became words; 'She' is from Norway, the mother lives in a slum area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई