Join us
Daily Top 2Weekly Top 5

त्यांनी तब्बल 165 कोटींची खोटी बिले तयार केली; दोन जणांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2023 07:46 IST

राज्य वस्तू व सेवा कर विभागाची कारवाई

मुंबई : तब्बल १६५ कोटी ७८ लाख रुपयांची बनावट बिले तयार करत त्याद्वारे शासनाच्या तिजोरीतून २७ कोटी ७४ लाख रुपयांचे इनपूट क्रेडिट मिळविणाऱ्या दोन व्यापाऱ्यांना राज्य वस्तू व सेवा कर विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. त्यानंतर त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मे. समस्ता ट्रेडिंग प्रा. लि. व शरद क्लिअरिंग अँड फॉरवर्डिंग प्रा. लि. या दोन कंपन्यांच्या मालकांनी अनेक बनावट कंपन्या स्थापन केल्या होत्या. राहुल अरविंद व्यास आणि विकी अशोक कंसारा अशी या दोन व्यापाऱ्यांची नावे आहेत. या दोघांनी अनेक बनावट कंपन्या स्थापन केल्या होत्या व त्या कंपन्यांद्वारे व्यवहार झाल्याची तब्बल १६५ कोटी रुपयांची बिले तयार केली होती.

दरम्यान, राज्य वस्तू व सेवा

कर विभागाच्या अन्वेषण (अ) विभागाच्या सहआयुक्त प्रेरण देशभ्रतार, उपायुक्त संजय सावंत यांच्या नेतृत्वाखाली अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे.

अद्ययावत तंत्रज्ञानाची मदत

राज्य वस्तू व सेवा कर विभागाने आपल्या कामकाजामध्ये अद्ययावत तंत्रज्ञान प्रणालीचा अवलंब केला आहे. त्यामुळे अशा संशयास्पद व्यवहारांची माहिती मिळण्यास त्यांना मदत होत आहे. यातूनच कर चुकवेगिरी करणाऱ्या किंवा शासनाची फसवणूक करणाऱ्या लोकांवर अधिकाऱ्यांनी कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे.

२७ कोटी रुपयांचे इनपुट क्रेडिट

हा व्यवहार झाल्याचे दाखवत त्या बिलांवर त्यांनी शासनाच्या तिजोरीतून २७ कोटी रुपयांचे इनपूट क्रेडिट मिळवले. मात्र, हे व्यवहार संशयास्पद असल्याचे निदर्शनास आल्यानंतर राज्य वस्तू व सेवा विभागाच्या अधिकाऱ्यांनी याची सखोल चौकशी केली असता हा घोटाळा झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तातडीने अटकेची कारवाई केली.