लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: कोणत्या ना कोणत्या वादात सापडल्याने गेल्या दहा वर्षांत मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची वेळ प्रमुख पक्षांच्या नेत्यांवर आली. त्या आधीदेखील काही जणांना मंत्रिपदावर पाणी सोडावे लागले होते.
फडणवीस मुख्यमंत्री असताना तेव्हाचे महसूल मंत्री एकनाथ खडसे यांना भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे राजीनामा द्यावा लागला. पुण्यातील एका भूखंड प्रकरणामुळे ते अडचणीत आले होते.
असाच एक गाजलेला राजीनामा होता तो उद्धव ठाकरे सरकारमधील वनमंत्री शिवसेनेचे संजय राठोड यांचा. पूजा चव्हाण या युवतीच्या पुण्यातील मृत्यूप्रकरणी त्यांचे नाव वादात अडकले आणि त्यांना मंत्रिपद सोडावे लागले.
उद्धव ठाकरे सरकारमधील गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींच्या वसुलीचे आरोप झाल्यानंतर तसेच अँटिलिया स्फोटके प्रकरणी तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी घेरल्यानंतर देशमुख यांना एप्रिल २०२१ मधे राजीनामा द्यावा लागला होता.
मुख्यमंत्रिपदावरही सोडावे लागले होते पाणी
मुंबईवर झालेल्या २६ नोव्हेंबर २००८ च्या अतिरेकी हल्ल्यानंतर ताज हॉटेलची पाहणी करायला चित्रपट निर्माते राम गोपाल वर्माना घेऊन गेल्यानंतर टीकेचे धनी ठरलेले विलासराव देशमुख यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.
त्याचवेळी ‘बडे बडे शहरों में छोटे छोटे हादसे होते ही रहते है’ असे विधान केल्याने टीकेची झोड उठल्यानंतर तत्कालीन उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर ११ नोव्हेंबर २०१० रोजी आदर्श प्रकरणी तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना राजीनामा द्यावा लागला होता.
सिंचन घोटाळ्याचे आरोप झाल्यानंतर अजित पवार यांनी २०१२ मध्ये उपमुख्यमंत्रिपदाचा (तेव्हा ते जलसंपदा मंत्रीदेखील होते) राजीनामा दिला पण काही महिन्यांतर पुन्हा मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून परतले होते.