टप्पा वाहतुकीच्या विरोधात तीव्र आंदोलन होणार
By Admin | Updated: January 6, 2015 01:29 IST2015-01-06T01:29:38+5:302015-01-06T01:29:38+5:30
टप्पा वाहतुकीची परवानगी खासगी वाहतूकदारांना देण्याच्या विचारात केंद्र सरकार असून, तसा प्रस्ताव रस्ते वाहतूक आणि महामार्ग विभागाने तयार केला आहे.

टप्पा वाहतुकीच्या विरोधात तीव्र आंदोलन होणार
मुंबई : टप्पा वाहतुकीची परवानगी खासगी वाहतूकदारांना देण्याच्या विचारात केंद्र सरकार असून, तसा प्रस्ताव रस्ते वाहतूक आणि महामार्ग विभागाने तयार केला आहे. या प्रस्तावामुळे देशातील त्याचबरोबर महाराष्ट्रातील सार्वजनिक उपक्रमातील वाहतुकीला मोठा फटका बसणार आहे. या प्रस्तावाला देशातील सार्वजनिक वाहतूक उपक्रमातील युनियनने विरोध केला असून, यासंदर्भात ६ फेब्रुवारी रोजी दिल्लीत बैठकही घेण्यात येणार आहे. या बैठकीला राज्यातील एसटी, बेस्ट, रिक्षा आणि टॅक्सी युनियनचे पदाधिकारी हजर राहणार आहेत.
रस्ते वाहतूक आणि महामार्ग विभागाने टप्पा वाहतुकीचा प्रस्ताव तयार करून १३ सप्टेंबर २०१४ रोजी वेबसाइटवर प्रसिद्ध केला. त्यानंतर १६ आॅक्टोबरपर्यंत या नवीन प्रस्तावावर देशातील सार्वजनिक, खासगी वाहतूकदार आणि युनियनकडून हरकती मागविण्यात आल्या. या प्रस्तावात सर्व सार्वजनिक वाहतूक उपक्रमांनी स्पर्धेत उतरावे असे म्हटले असून, मार्ग भाड्याने देण्याची तरतूद केली आहे. हे मार्ग निविदा मागवून भाड्याने देण्यात येणार असून, त्यामुळे फायद्यात चालणारे सर्व मार्ग बड्या वाहतूक कंपन्या घेण्याची शक्यता आहे. तर सार्वजनिक वाहतूक सेवांच्या वाट्याला तोट्यातील मार्ग येतील, अशी भीती सर्वच सार्वजनिक वाहतूक सेवांना आहे. टप्पा वाहतुकीला विरोध म्हणून देशातील सर्व वाहतूक युनियनकडून नुकतेच दिल्लीत धरणे आंदोलनही करण्यात आले. आता आंदोलनाची धार आणखी तीव्र करण्यासाठी ६ फेब्रुवारी रोजी दिल्लीत सार्वजनिक उपक्रमातील वाहतूक युनियनची बैठक बोलावल्याची माहिती महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष शिवाजीराव चव्हाण यांनी सांगितले.