Join us  

महाराष्ट्र निवडणूक निकाल 2019: मुख्यमंत्रिपदाबाबत कोणताही समझौता होणार नाही- देवेंद्र फडणवीस 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2019 1:03 PM

Maharashtra Vidhan Sabha Election 2019 : मुख्यमंत्रिपदाबाबत कोणताही समझोता होणार नसल्याचा स्पष्ट इशारा देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला दिला आहे.

मुंबई- मुख्यमंत्रिपदाबाबत कोणताही समझौता होणार नसल्याचा स्पष्ट इशारा देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला दिला आहे. अडीच वर्षांचं मुख्यमंत्रिपद देऊ, असं कधीच कबूल केलं नव्हतं. 1995चा फॉर्म्युला येईल वगैरे असं काहीही होणार  नाही, सीएमपदासाठी प्रस्ताव आला होता, पण अशी कुठलीही बातचीत झाली नाही, असं अमित शहांनीही मला सांगितल्याचा खुलासाही मुख्यमंत्र्यांनी केला आहे. देवेंद्र फडणवीसांच्या या विधानानंतर शिवसेना आणि भाजपामधली धूसफूस आणखी वाढण्याची शक्यता आहे.   

भाजपाच्या नेतृत्वातच सरकार स्थापन होईल. अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाचा शिवसेनेला शब्द दिलेला नव्हता. वाटाघाटीत अडीच वर्षांत मुख्यमंत्रिपदाचा शब्द नव्हता. आम्ही चर्चेतून तोडगा काढण्याचा प्रयत्न करू, कोणतीही आडमुठी भूमिका नाही. त्यांच्या मागण्या रास्त असल्यास विचार करू. आम्ही कुठलाच पर्याय शोधत नाही आहोत. शिवसेनाही शोधत नाही आहे. निम्मं निम्मं काय ठरलं होतं ते येत्या दोन ते तीन दिवसांत कळेल, असंही सूचक विधान मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. फडणवीस म्हणाले, भाजपाध्यक्ष अमित शाह मुंबईत येणार नाहीत. पंतप्रधानांनी आधीच स्पष्ट केलंच आहे, मात्र उद्या होणाऱ्या बैठकीत विधिमंडळाचा नेता कोण यावर शिक्कामोर्तब होईल, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी पुढील पाच वर्षांसाठी आपणच मुख्यमंत्री होणार असल्याचं सांगितलं. 1995चा फॉर्म्युला वगैरे काहीही ठरलेले नाही. शिवसेनेने अजून काहीही मागणी केलेली नाही. मीडियाला सरकार स्थापनेबाबत सरप्राईज देणार असल्याचंही फडणवीस म्हणाले आहेत. आतमध्ये काय आहे हे तुम्हाला माहीत नाही. पण लवकरच फॉर्म्युला कळेल. आमचा ‘ए’ प्लॅनच आहे, बी प्लॅन नाही, असंही फडणवीसांनी स्पष्ट केलं आहे. 

शिवसेनेच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक शनिवारी मुंबईत झाली होती. अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रिपद आपल्याकडे घ्या आणि सत्तेत ‘फिफ्टी-फिफ्टी’चा वाटाही घ्या, असा आग्रह शिवसेनेच्या आमदारांनी तिथे धरला होता. सत्तास्थापनेबाबत सर्व निर्णय घेण्याचे अधिकार आमदारांनी उद्धव यांना दिले होते. शिवसेनेचे आ. प्रताप सरनाईक यांनी बैठकीनंतर सांगितले की, अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदासह जे जे ठरेल ते भाजपाने लेखी द्यावे. त्यानंतर आता मुख्यमंत्र्यांनी असं काहीही होणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. अडीच वर्षांचं मुख्यमंत्रिपद देऊ, असं कधीच कबूल केलं नसल्याचं सांगत मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेला सूचक इशारा दिला आहे.  भाजपाने 105 जागांसह दोन अपक्ष आमदारांचा पाठिंबा मिळवत मोठा पक्ष होण्याचा मान मिळवला. मात्र कोणत्याही एका पक्षाला 145 हा सत्ता स्थापनेच्या आकडा गाठता आलेला नाही. शिवसेना 56 जागांसह दुसऱ्या, राष्ट्रवादी 54 जागांसह तिसऱ्या, काँग्रेस 44 जागांसह चौथ्या स्थानावर आहे. त्यामुळे सत्ता स्थापनेसाठी शिवसेना-भाजपा एकत्र येतील, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.  

टॅग्स :देवेंद्र फडणवीसमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019