रेल्वे तिकीट खिडक्यांवर रांगा लागणार नाहीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2025 12:33 IST2025-03-02T12:33:13+5:302025-03-02T12:33:26+5:30
ज्यामुळे प्रवाशांना तिकीट खिडक्यांवर लांब रांगा टाळता येतात, असा दावा यावर मध्य रेल्वेने केला आहे.

रेल्वे तिकीट खिडक्यांवर रांगा लागणार नाहीत
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मुंबई विभागातील ८६ रेल्वे स्थानकांवर ५७५ नवीन एटीव्हीएम (स्वयंचलित तिकीट व्हेंडिंग मशीन) बसवण्यात आल्या आहेत. आणखी २२६ एटीव्हीएम खरेदीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. एटीव्हीएम जलद तिकीट सुविधा प्रदान करतात. ज्यामुळे प्रवाशांना तिकीट खिडक्यांवर लांब रांगा टाळता येतात, असा दावा यावर मध्य रेल्वेने केला आहे.
मध्य रेल्वेकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिव्यांग प्रवाशांच्या फायद्यासाठी मुख्य आणि हार्बर मार्गावरील विविध स्थानकांवर एकूण १७० नवीन बझर बसवण्यात आले आहेत. हे बड़झर दिव्यांग प्रवाशांना, विशेषतः दृष्टिहीन प्रवाशांना, दिव्यांगांसाठीच्या जागा शोधण्यासाठी उपयुक्त आहेत.
दिव्यांगांसाठी सोय
कर्जत स्थानकाच्या कल्याण टोकावरील पादचारी पुलावरील प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर दोन सरकते जिने सुरू केले आहेत. कर्जत टोकावरील पादचारी पुलावर शेलू स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर प्रवाशांसाठी उद्वाहक सुरू करण्यात आले आहे.
चार नवीन जीपीएस घड्याळे
सँडहर्स्ट रोड स्टेशनवर चार नवीन जीपीएस घड्याळे बसवली आहेत. घणसोली, रबाळे आणि ऐरोली स्थानकांवरील जुने उपनगरीय रेल्वे निर्देशक बदलून चांगले दृश्यमानता असलेले नवीन निर्देशक बसवले आहेत.
उल्हासनगर, वांगणी आणि नेरळ स्थानकांवर नवीन ऑल-इन-वन व्हिडिओ डिस्प्ले इंडिकेटर बसवण्यात आले आहेत. उल्हासनगर स्थानकावरील सर्व जुने सार्वजनिक घोषणा प्रणालीचे स्पीकर्स नवीन स्पीकर्सने बदलले आहेत.