लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: बाभळेश्वर-कुडूस ४०० केव्ही हा वीजवाहिनी प्रकल्प गुरुवारी पूर्ण झाला असून, ही वीजवाहिनी सुरू करण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे वीजपुरवठा सक्षम, स्थिर होणार असून, या वाहिनीवरून सुमारे ३ हजार मेगावॅटपर्यंत अतिरिक्त वीजवहन क्षमता उपलब्ध होणार आहे. त्याचा मुंबई, ठाणे, पालघर आणि अहिल्यानगर जिल्ह्यांना फायदा होणार असून या वाहिनीमुळे महामुंबईत आता ब्लॅक आऊट होणार नाही, असे महापारेषणकडून सांगण्यात आले.
महापारेषणकडून बाभळेश्वर-कुडूस या वीजवाहिनी प्रकल्पासाठी १५०० कोटी रुपये खर्च झाले असून हा पंधरा वर्षांत हा प्रकल्प पूर्ण झाला आहे. २०१० मध्ये मंजूर झालेल्या प्रकल्पाची अंमलबजावणी कल्पतरू प्रोजेक्ट्स इंटरनॅशनल लिमिटेडमार्फत करण्यात आली. सुरुवातीला २०१३ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट होते. पण नवी वीजवाहिनी पुणे जिल्ह्यातील जागतिक दर्जाच्या रेडिओ दुर्बिणीच्या परिसरातून प्रकल्प मार्ग जात असल्याने विशेष परवानग्या घ्याव्या लागल्या, असे पारेषणकडून सांगण्यात आले.
जमिनीचे मोबदले, वनविभाग परवानग्या, राईट ऑफ वे समस्या, जंगलातून साहित्य वाहतूक अशी विविध कारणांनी या प्रकल्पाला विलंब झाला. मात्र यंत्रणांच्या समन्वयामुळे मार्चपर्यंत हे काम पूर्ण करण्यात आले, असे महापारेषणकडून सांगण्यात आले.
काय फायदा?
- वीजवाहिनीमुळे सद्यस्थितीतील पडघे-बाभळेश्वर १ व २ या वीजवाहिनीवरील ताण कमी होणार.
- कुडूस उपकेंद्राला अतिरिक्त वीज स्रोत उपलब्ध होईल.
- प्रकल्पामुळे सुमारे ५ मेगावॅट वीज नुकसान कमी होणार. पडघे-बाभळेश्वर वीजवाहिनीवरील ताण कमी होणार
वाहिन्यांवरील ताण कमी होणार
- मुंबईची दिवसाची विजेची मागणी सुमारे साडेतीन हजार मेगावॉट आहे. उन्हाळ्यात विजेची मागणी काही वेळा ४ हजार मेगावॉटपर्यंत जाते.
- मागणीनुसार विजेचा पुरवठा करताना सद्यस्थितीमध्ये असलेल्या वीज वाहून नेणाऱ्या पारेषण वाहिन्यांवर ताण येतो. परिणामी तांत्रिक बिघाड होतात आणि मुंबई अंधारात जाते.
- यापूर्वी कोरोनाकाळासह नंतरच्या काळात पारेषण वाहिन्यांवर आलेला ताण आणि तांत्रिक बिघाडामुळे दोन ते तीन वेळा मोठ्या कालावधीसाठी वीजपुरवठा खंडित झाला होता.
- हा पुरवठा पूर्ववत होण्यास मोठा कालावधी लागला होता. आता नव्या वाहिनीमुळे वीज वाहून नेणाऱ्या वाहिन्यांवर ताण येणार नाही. त्यामुळे बत्ती गुल होणार नाही, असा दावा महापारेषणने केला आहे.
Web Summary : Mumbai, Thane & Palghar's power supply strengthened with new Babhaleshwar-Kudus power line. The ₹1500 crore project increases capacity by 3000 MW, preventing blackouts and reducing strain on existing lines. Power outages unlikely now.
Web Summary : मुंबई, ठाणे और पालघर को नई बाभलेश्वर-कुडूस बिजली लाइन से बिजली आपूर्ति मजबूत हुई। ₹1500 करोड़ की परियोजना से 3000 मेगावाट क्षमता बढ़ी, ब्लैकआउट रोका गया और मौजूदा लाइनों पर तनाव कम हुआ। बिजली गुल होने की आशंका कम।