Join us  

विमान प्रवासात मास्क, सोशल डिस्टन्सिंग, थर्मल स्क्रीनिंग होणार 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2020 5:20 PM

देशात हवाई वाहतूक सुरु होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

 

मुंबई: देशाच्या विविध भागात अडकलेल्या नागरिकांना आपापल्या घरी सोडण्यासाठी देशाच्या विविध ठिकाणांहून विशेष रेल्वे सेवा चालवण्यात येत आहे. याचेच पुढील पाऊल म्हणून देशात हवाई वाहतूक सुरु होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. याबाबत लवकरच निर्णय जाहीर होऊ शकेल असे सांगण्यात आले. मात्र लॉकडाऊन नंतर विमान सेवा सुरु झाल्यावर हवाई प्रवास करणाऱ्या प्रवाशांना विविध नवीन नियमांचे पालन करावे लागणार आहे.  

हवाई प्रवाशांना आरोग्य सेतू अँप डाऊनलोड करणे अनिवार्य होणार आहे. प्रवाशांनी पूर्ण प्रवासात फेस मास्क वापरणे सक्तीचे होईल.  विमानात प्रवेश करण्यापूर्वी प्रवाशाची थर्मल स्क्रीनिंग केली जाईल. ज्या प्रवाशांना कोविड 19 ची कोणतीही लक्षणे नसतील केवळ त्याच प्रवाशांना हवाई प्रवास करण्यास परवानगी देण्यात येईल.  विमानतळावर प्रवासी व कर्मचारी यांचा वारंवार संपर्क येऊ शकेल व कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू शकेल अशा स्थळांचा अभ्यास केला जात असून अशा ठिकाणी अधिक काळजीपूर्वक काम केले जाईल. विमानतळावर प्रवासी व कर्मचाऱ्यांचा प्रत्यक्ष संबंध कमीतकमी कसा येईल याची काळजी घेतली जाईल. प्रवाशाचे सामान बँगेज काऊंटरमधून पुढे जाताना त्याला फार संपर्क होणार नाही अशी व्यवस्था तयार केली जात आहे. विमानतळावर प्रवेश केल्यावर प्रवेशद्वारावरच सँनिटायझर वापरायला दिला जाईल. प्रवेशद्वारावरच प्रवाशाचे थर्मल स्क्रीनिंग केले जाईल.  प्रवाशाचे तिकीट व ओळखपत्र प्रत्यक्ष हातात घेऊन तपासण्याऐवजी त्याचे स्कँनिंग केले जाईल. 

कोणत्याही परिस्थितीत कोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठी विविध उपाययोजना विमानतळावर व विमान प्रवासात केल्या जाणार आहेत. विमानात दोन प्रवाशांच्या मध्ये एक आसन रिक्त ठेवण्याची व त्याद्वारे सोशल डिस्टन्सिंग करण्याची सूचना यापूर्वीच करण्यात आली आहे. लॉकडाऊन नंतर विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत 25 ते 30 टक्के घट होण्याचा अंदाज वर्तवला जात अाहे. त्यामुळे हवाई वाहतूक कंपन्यांच्या तोट्यात अधिकच भर पडण्याचा धोका आहे.  

 

 

 

टॅग्स :कोरोना वायरस बातम्याविमानतळमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसकोरोना सकारात्मक बातम्या