Join us
Daily Top 2Weekly Top 5

अंतिम वर्ष ऑनलाइन परीक्षेतील तांत्रिक त्रुटींची होणार चौकशी; समितीची स्थापना

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2020 03:31 IST

अहवाल सादर करण्यासाठी एक महिन्याची मुदत

मुंबई : यंदा कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा राज्यातील विद्यापीठांना ऑनलाइन घेण्याच्या सूचना उच्च व तंत्र शिक्षण विभागाने केल्या होत्या. मुंबई, पुणे, नागपूरसारख्या काही विद्यापीठांना अंतिम वर्षाच्या परीक्षांवेळी काही तांत्रिक अडचणी आल्याने मनस्ताप सहन करावा लागल्याच्या विद्यार्थ्यांच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर आल्या. याच पार्श्वभूमीवर या तांत्रिक त्रुटींच्या चौकशीसाठी मंत्रालयातील माहिती तंत्रज्ञान संचालनालयाच्या संचालकांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली आहे.मुंबई विद्यापीठ, आयडॉल विभागाच्या अंतिम परीक्षांच्या संदर्भात कंपनीकडून झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे विद्यापीठाला परीक्षा पुढे ढकलाव्या लागल्या. याच प्रकारे पुण्याच्या सावित्रीबाई फुले, नागपूरच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ, अमरावती विद्यापीठ येथेही तांत्रिक बिघाडांमुळे अडचणी आल्याच्या तक्रारी उच्च व तंत्र शिक्षण विभागाला प्राप्त झाल्या.२३ ऑक्टोबर रोजी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे २०१९-२०च्या अंतिम वर्ष परीक्षेच्या घेण्यात आलेल्या आढाव्यात हा मुद्दा उपस्थित करण्यात आला. यावेळी सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंच्या उपस्थितीत उच्च व तंत्र शिक्षणमंत्र्यांनी या त्रुटींच्या चौकशीसाठी समिती स्थापन करण्याचे निर्देश दिले. या समितीला ज्या विद्यापीठांत परीक्षांच्या दरम्यान तांत्रिक बिघाड झाले, त्यांची चौकशी करून एक महिन्याच्या आत अहवाल सरकारला सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.अशी आहे समितीसमितीमध्ये अध्यक्षांसह एकूण ७ सदस्यांचा समावेश आहे. तंत्र शिक्षण संचालक व उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे उपसचिव हे समितीचे सदस्य असणार असून संबंधित विद्यापीठाचे कुलगुरू, कुलसचिव आणि परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक हे निमंत्रित सदस्य म्हणून काम पाहतील. उच्च शिक्षण संचालक हे समितीचे सदस्य सचिव आहेत.