Join us  

पोषण आहाराच्या मूल्यात होणार वाढ, शाळेत खिचडीसोबत आता मिळणार धान्याचे न्यूट्रिटिव्ह स्लाईस 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2021 10:04 AM

Mumbai : आरोग्यालाही उपयुक्त असलेल्या या बिस्किटांना न्यूट्रिटिव्ह स्लाईस म्हटले जाणार आहे. यामुळे निश्चितच विद्यार्थ्यांच्या पोषण आहारातील पोषण मूल्यांत वाढ होणार असल्याचा विश्वास व्यक्त करून शिक्षणाधिकाऱ्यांनी या निर्णयाचे स्वागत केले. 

- सीमा महांगडे 

मुंबई : शाळांमध्ये दिल्या जाणाऱ्या पोषण आहाराच्या पोषणात अधिक वाढ होणार आहे. शाळांमध्ये देण्यात येणाऱ्या खिचडीसह आता विद्यार्थ्यांना ज्वारी, बाजरी, नाचणीसारख्या धान्याचे पौष्टिक स्लाईस देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दिवाळीनंतर या निर्णयाची अंमलबजावणी होणार असल्याची शक्यता आहे. या निर्णयाचे शाळा प्रशासन आणि महापालिका प्रशासनाकडून स्वागत होत आहे.

आरोग्यालाही उपयुक्त असलेल्या या बिस्किटांना न्यूट्रिटिव्ह स्लाईस म्हटले जाणार आहे. यामुळे निश्चितच विद्यार्थ्यांच्या पोषण आहारातील पोषण मूल्यांत वाढ होणार असल्याचा विश्वास व्यक्त करून शिक्षणाधिकाऱ्यांनी या निर्णयाचे स्वागत केले. जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि ‘डाएट’च्या प्राचार्यांची शिक्षण परिषद जून महिन्यात पार पडली. या बैठकीत विद्यार्थ्यांच्या पोषण आहारासंदर्भात विविध निर्णय घेण्यात आले.

यामध्येच ज्वारी, बाजरी, नाचणी या धान्याची मागणी भारतीय अन्न महामंडळाकडे केली जाणार असून या धान्याचा वापर करून पाककृतीच्या सहाय्याने विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात वैविध्य आणण्याचा निर्णय घेण्यात आला. जिल्ह्यांतील लाभार्थी विद्यार्थीसंख्येनुसार धान्याची मागणी प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडे नोंदविण्यात आली. 

विद्यार्थ्यांना अधिकचे पोषण यादरम्यान, विद्यार्थ्यांची तांदूळ-खिचडी चालू राहणार आहे. संपूर्ण वर्षातील २१ दिवसांसाठी हे स्लाईस देण्यात येणार असल्याची माहिती पालिका शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे. 

उत्तम पोषणात भर कोविडचे संकट पाहता अनेक विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती ढासळली आहे. या दरम्यान शाळा सुरू झाल्यावर अनेक विद्यार्थ्यांना याचा लाभ घेता येईल. त्यांच्या आहाराच्या पोषण मूल्यात भर पडणार आहे. त्यामुळे हा उपक्रम स्तुत्य आहे यात वाद नाही - धनश्री चांदेकर, विद्यार्थिनी 

पोषण आहारातील नवीन न्यूट्रिटिव्ह स्लाईसची वाट उत्सुकतेने पाहत आहोत. त्याची चव निश्चित वेगळी असणार आहे शिवाय विविध धान्यांमुळे त्यांच्यातील पौष्टिक तत्त्वही वाढेल. - सुहास राणे, विद्यार्थी

टॅग्स :शाळा