Join us
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभा निवडणुकीत होणार कांटे की टक्कर; कुणाला मिळणार उमेदवारी याकडे लागले लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2023 13:55 IST

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी करायला सुरुवात केली आहे

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी करायला सुरुवात केली आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. परिणामी, राज्यात झालेल्या राजकीय उलथापालथीनंतर आगामी निवडणुकीत मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघांचे चित्र बदललेले आहे. आगामी निवडणुका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही लढू, असा ठाम दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी केला आहे. मात्र, शिंदे गट, भाजप आणि अजित पवार गट विरुद्ध उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट, वंचित आघाडी यांची महाविकास आघाडी यांच्यात कांटे की टक्कर अपेक्षित आहे. त्यामुळे युती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होण्याची शक्यता आहे.

मुंबईत दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, उत्तर मध्य मुंबई, उत्तर पूर्व मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई आणि उत्तर मुंबई असे सहा लोकसभा मतदारसंघ आहे. उत्तर मध्य मुंबई, उत्तर पूर्व मुंबई, उत्तर मुंबई हे तीन लोकसभा मतदारसंघ भाजपकडे आहेत. शिवसेनेच्या फुटीनंतर दक्षिण मुंबई शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, तर दक्षिण मध्य मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई हे शिंदे गटाकडे आहेत.

उत्तर मध्य मुंबईतून भाजप विद्यमान खासदार पूनम महाजन यांना परत तिकीट देणार की नवा चेहरा देणार, अशी चर्चा आहे. मात्र, पूनम महाजन यांचा चेहरा मतदारसंघात तसा कमीच दिसला, असे मतदार सांगतात. त्यामुळे उबाठा आणि भाजप येथून कोणाला तिकीट देणार याकडे लक्ष लागले आहे.

विद्यमान खासदार

  • उत्तर मुंबई      गोपाळ शेट्टी (भाजप)
  • उत्तर पश्चिम मुंबई      गजानन कीर्तिकर (शिंदे गट)
  • उत्तर मध्य मुंबई      पूनम महाजन  (भाजप)
  • दक्षिण मध्य मुंबई      राहुल शेवाळे (शिंदे गट)
  • दक्षिण मुंबई      अरविंद सावंत (उबाठा)
  • उत्तर पूर्व मुंबई      मनोज कोटक (भाजप)

राजकीय चर्चांना उधाण

उत्तर मुंबईतून विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी यांनी गेल्या ९ वर्षांत प्रभावी कामगिरी केली असून, त्यांना ‘संसद रत्न’ पुरस्काराने गौरविलेले आहे. महाराष्ट्रातून सर्वांत अधिक मतांनी निवडून येणारे ते खासदार आहेत. त्यामुळे त्यांना परत निवडणुकीच्या रिंगणात उतरविले जाण्याची शक्यता आहे. मात्र, त्यांच्या जागी नवा चेहरा म्हणून चारकोपचे विद्यमान आमदार योगेश सागर, विद्यमान केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्या नावाची कुजबुजही सुरू आहे.

दक्षिण मध्य मुंबईचे शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांच्याविरोधात वंचित आघाडीतून प्रकाश आंबेडकर किंवा माजी महापौर विशाखा राऊत यांच्या नावाची चर्चा आहे. दक्षिण मुंबईतून उपनगर पालक मंत्री मंगल प्रभात लोढा यांना भाजप उमेदवारी देणार अशी चर्चा आहे. त्यांची लढत उबाठाचे खासदार अरविंद सावंत यांच्याशी होईल, अशी चर्चा आहे.  उत्तर पूर्व मुंबईतून भाजप खासदार मनोज कोटक यांना परत उमेदवारी मिळणार, अशी चर्चा आहे. तर पक्षाने सांगितले तर निवडणूक लढवणार, असे संकेत संजय राऊत यांनी दिले.

टॅग्स :मुंबईराजकारण