Join us

दिवाळीसाठी एसटी प्रशासनाच्या ३५९ विशेष जादा बस धावणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2019 06:08 IST

२४ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबरपर्यंत सुविधा उपलब्ध

मुंबई : दिवाळीनिमित्त प्रवाशांच्या गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी एसटी प्रशासन दररोज ३५९ जादा विशेष बस सोडणार आहे. राज्यातील प्रत्येक आगारातून २४ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबरपर्यंत जादा बस सोडण्यात येणार आहेत.

२५ ऑक्टोबरला धनत्रयोदशी, २७ ऑक्टोबरला लक्ष्मीपूजन, नरक चतुर्दशी, २८ ऑक्टोबरला दीपावली पाडवा, बलिप्रतिपदा आणि २९ ऑक्टोबरला भाऊबीज आहे. यानिमित्त प्रवाशांना गावी जाण्यासाठी आणि परतीच्या प्रवासासाठी विशेष बस सेवेची सोय एसटी प्रशासनाने उपलब्ध करून दिली आहे.

विशेष बसच्या आरक्षणाची सुविधा एसटीने प्रवाशांसाठी प्रत्येक आगार, बस स्थानकावर उपलब्ध करून दिली आहे. दिवाळी हंगाम संपेपर्यंत एसटीच्या कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या कमी करण्यात आल्या आहेत. तसेच दिवाळी तिकीट दरवाढ न केल्याने प्रवाशांना दिलासा मिळेल.

मुंबईतून १२, ठाणे १९, पालघर २२, रत्नागिरी १४, सिंधुदुर्ग ८, पुणे ६४, कोल्हापूर ७, सातारा ३, सांगली ४, अमरावती २, यवतमाळ ५, नाशिक २३, जळगाव ८, धुळे ३५, अहमदनगर ९, औरंगाबाद १४ बीड ९, जालना ५, लातूर १०, नांदेड १३, उस्मानाबाद ११, परभणी २३ अशा विभागवार जादा विशेष बस सोडण्याचे नियोजन एसटीने केले आहे.

‘प्रवासी मित्र’द्वारे विशेष गाड्यांची माहिती

एसटीच्या विभागातील कर्मचाºयाला प्रवाशांच्या सुविधेसाठी ‘प्रवासी मित्र’ म्हणून नेमण्यात आले आहे. आगारातील, बस स्थानकातील विशेष गाड्या, थांब्यांची माहिती या ‘प्रवासी मित्र’द्वारे प्रवाशांना देण्यात येईल. यामुळे प्रवाशांची गैरसोय होणार नाही, असे एसटी प्रशासनाने सांगितले.

टॅग्स :दिवाळी