Join us  

शिवडी-न्हावाशेवा सी-लिंकला समांतर अशी मेट्रोही होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2021 10:30 AM

शिवडी ते न्हावा-शेवा या सी-लिंक मार्गाला समांतर अशी मेट्रो मार्गिका बांधण्याचा ‘एमएमआरडीए’चा विचार आहे.

ठळक मुद्देशिवडी ते न्हावा-शेवा या सी-लिंक मार्गाला समांतर अशी मेट्रो मार्गिका बांधण्याचा ‘एमएमआरडीए’चा विचार आहे.

नारायण जाधव

ठाणे : मुंबई आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या शिवडी ते न्हावा-शेवा या सी-लिंक मार्गाला समांतर अशी मेट्रो मार्गिका बांधण्याचा ‘एमएमआरडीए’चा विचार आहे. यामुळे दक्षिण मुंबई ते नवी मुंबई ही दोन शहरे समुद्रमार्गेही प्रस्तावित मेट्रो मार्गिकेमुळे जोडली जाणार असून, त्यांचा लाभ दोन्ही शहरांतील लाखो प्रवाशांना  होणार  आहे. या नव्या मेट्रो मार्गाचे स्ट्रक्चरल डिझाइन तयार करण्यासाठी कंत्राटदारास प्राथमिक खर्च  म्हणून तीन कोटी रुपये देण्यास एमएमआरडीएने १३ सप्टेंबर २०२१ रोजी झालेल्या बैठकीत मान्यता दिली आहे. 

 नवी मुंबईच्या परिसरात ज्या ठिकाणी हा सी-लिंक मार्ग जोडला जाणार आहे, त्याला लागूनच सध्या जोमाने काम सुरू असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम सुरू आहे. २०२४ अखेरपर्यंत येथून विमानोड्डाण करण्याचा सिडकोचा मानस आहे. शिवाय जवाहरलाल नेहरू आंतरराष्ट्रीय बंदर आणि  त्या परिसरात विकसित होणाऱ्या सेझ प्रकल्पांसह द्रोणागिरी आणि उलवे परिसरांत विविध निवासी वसाहतींचे काम येथे वेग घेत आहे. यामुळे ही  प्रस्तावित नवी मेट्रो मार्गिका येथे राहणाऱ्या किंवा नवी मुंबई ते मुंबई अशी रोज राेजगारासाठी ये-जा करणाऱ्यांना उपयुक्त ठरणार आहे. यामुळे या सी-लिंकला समांतर मेट्रो मार्गिका बांधण्याचा विचार महानगर आयुक्तांनी या बैठकीत बोलून दाखविला आहे. त्यावेळी झालेल्या चर्चेत मुख्य सचिवांनी मेट्रो मार्गिकेच्या शिवडी बाजूकडील तीव्र वळणे आणि चढउतारांचा विचार करून डिझाइन तयार करावे, अशी सूचना केली. 

यानंतर सी-लिंकला लागून मेट्रो मार्ग होऊ शकतो का, त्याचा किती खर्च येईल, अशाच इतर तत्सम बाबींच्या अभ्यासासाठी आणि त्याचे स्ट्रक्चरल  डिझाइन  तयार करण्यासाठी कंत्राटदारास  प्राथमिक खर्च  म्हणून तीन कोटी रुपये देण्यास ‘एमएमआरडीए’ने मान्यता दिली.

टॅग्स :मेट्रोमुंबईठाणेनवी मुंबई