कारवाई अभावी आठवडे बाजार जैसे थे

By Admin | Updated: February 23, 2015 00:53 IST2015-02-23T00:53:52+5:302015-02-23T00:53:52+5:30

वाहतूक व दळणवळणाला अडथळा निर्माण करणाऱ्या शहरातील बेकायदा आठवडे बाजारावर कारवाई करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यां

There were weeks of absence of action in the market | कारवाई अभावी आठवडे बाजार जैसे थे

कारवाई अभावी आठवडे बाजार जैसे थे

नवी मुंबई : वाहतूक व दळणवळणाला अडथळा निर्माण करणाऱ्या शहरातील बेकायदा आठवडे बाजारावर कारवाई करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांनी संबंधित विभागाला दिले होते. मात्र त्यानंतरही हे आठवडे बाजार मात्र सर्रास सुरू असल्याचे दिसून आले आहे. तुर्भे नाका येथील प्रत्येक रविवारी भरणाऱ्या आठवडे बाजारातील फेरीवाल्यांनी चक्क स्कायवॉकवर अतिक्रमण केल्याचे पाहावयास मिळाले आहे.
नवी मुंबईत आठवडे बाजाराची जुनी परंपरा आहे. प्रत्येक ठिकाणच्या बाजाराचा दिवस ठरलेला असतो. सानपाडा येथे सोमवारी तर दिघा एमआयडीसी शुक्रवारी बाजार भरतो. त्याचप्रमाणे घणसोलीत रविवार, कोपरखैरणे बुधवार, ऐरोलीत गुरुवार आणि शुक्रवार. नेरूळ-शिरवणे नाका आणि तुर्भे नाका येथे रविवार असे बाजाराचे दिवस ठरलेले आहेत. गेल्या महिन्यात स्थायी समितीच्या बैठकीत लोकप्रतिनिधींनी नागरिकांना वेठीस धरणाऱ्या या आठवडे बाजारांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानुसार ठिकठिकाणच्या आठवडे बाजारांवर कारवाई करण्याचे निर्देश आयुक्त वाघमारे यांनी संबंधित विभागाला दिले होते. मात्र त्यानंतरसुध्दा हे आठवडे बाजार सुरूच असल्याचे दिसून आले आहे.
तुर्भे नाका येथे दर रविवारी भरणाऱ्या आठवडे बाजाराला अनेक वर्षांची परंपरा आहे. ही परंपरा आजही सुरू आहे. मात्र येथील रस्त्याचे झालेले विस्तारीकरण, परिसरातील वाढते नागरीकरण यामुळे हा बाजार आता थेट रस्त्यावर भरत आहे. तुर्भे नाका येथील चौकातील चारही मार्गावर हा बाजार भरत असल्याने रविवारच्या दिवशी येथे वाहतुकीचा चक्का जाम झाल्याचे पाहावयास मिळते. विशेष म्हणजे नागरिकांना रस्ता ओलांडण्यासाठी उभारण्यात आलेल्या स्कायवॉकवरही आता फेरीवाल्यांनी अतिक्रमण केल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे नागरिकांना तेथून वावर करणे अवघड होवून बसले आहे. तुर्भे नाक्याप्रमाणेच इतर ठिकाणचे आठवडे बाजारही नित्यनियमाने सुरू असल्याचे दिसून आले आहे. यापार्श्वभूमीवर संबंधित विभागाच्या कार्यपध्दतीविषयी संताप व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान,आयुक्तांच्या निर्देशानुसार शहरातील आठवडे बाजारांवर नियमित कारवाई करण्यात येत आहे. मागील दोन आठवडे ऐरोली येथे गुरुवारी भरणाऱ्या बाजारांवर कारवाई करण्यात आली आहे. इतर ठिकाणच्या आठवडे बाजारांवर तातडीने कारवाई करण्याच्या सूचना संबंधित वॉर्ड अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे अतिक्रमण विभागाचे उपायुक्त सुभाष गायकर यांनी सांगितले.(प्रतिनिधी)

Web Title: There were weeks of absence of action in the market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.