मुरबाडमधील ११४ गावे झाली चकाचक
By Admin | Updated: February 8, 2015 22:50 IST2015-02-08T22:50:20+5:302015-02-08T22:50:20+5:30
डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने रविवार, ८ फेब्रुवारीला मुरबाड तालुक्यातील विविध ११४ गावांमध्ये स्वच्छता मोहीम राबविण्यात आली

मुरबाडमधील ११४ गावे झाली चकाचक
धसई : डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने रविवार, ८ फेब्रुवारीला मुरबाड तालुक्यातील विविध ११४ गावांमध्ये स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. त्यामुळे अनेक गावांतील कचरा साफ करून या गावांचा चेहरामोहराच बदलला असून ही गावे चकाचक झाली आहेत.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भारत स्वच्छता मोहिमेत डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांची स्वच्छतादूत म्हणून निवड केली आहे. सार्वजनिक स्वच्छता ही केवळ सामाजिक बांधिलकी नसून प्रत्येक नागरिकाचे आद्यकर्तव्य आहे. यासाठी मुरबाड तालुक्यात रविवारी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. याअंतर्गत तालुक्यातील ७५ ग्रामपंचायतींच्या हद्दीतील ११४ गावे स्वच्छ करण्यात आली. यात तालुक्यातील १० हजार श्रीसदस्य सहभागी झाले होते. तर, ११४ ट्रॅक्टर कचरा वाहून नेण्यासाठी ठेवण्यात आले होते. जमा केलेला कचरा योग्य ठिकाणी टाकण्यात आला. नागाव, शिवळे, खाटेघर, कोरावळे, भुवन, सरळगाव, सिंगापूर, पळू, रामपूर, कुंदे, मामणोली, म्हसा, कुडवली अशा गावांतील मुख्य रस्त्यांसह छोटी-मोठी डम्पिंग ग्राउंडही स्वच्छ करून तेथील कचरा साफ करून ही गावे चकाचक केली. (वार्ताहर)