Join us  

Maharashtra Election 2019 : बाळासाहेब असताना शिवसेनेत नेते आयात करायची गरज नव्हती : राज ठाकरे 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2019 9:17 PM

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गोरेगावच्या प्रचारसभेत शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

मुंबईः मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गोरेगावच्या प्रचारसभेत शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला आहे. बाळासाहेब असताना शिवसेनेत नेते आयात करायची कधीही गरज नव्हती, नेते शिवसेनेतच तयार होत होते, पण आता आयात करावे लागत आहेत, असा टोलाही राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे. तसेच आरेमधल्या वृक्षतोडीवरून त्यांनी शिवसेनेला खडे बोल सुनावले आहेत. राज्याचे पर्यावरणमंत्री शिवसेनेचे आहेत, ते वृक्ष तोड थांबवू शकले नाहीत?, शिवसेनापक्षप्रमुख म्हणतात ‘आम्हाला सत्ता द्या, आम्ही आरेला जंगल घोषित करू’, आम्हाला मूर्ख समजता का?, असा प्रश्नही राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे. पुढे राज ठाकरे म्हणाले, उद्योगधंदे बंद होत आहेत, बँका बुडत आहेत, बेरोजगारांना काम मिळत नाही आणि सरकार थंड आहे, कारण कोणी काही बोलत नाहीये. काय झालं शिवस्मारकाचं? अहो ह्या महाराष्ट्राला फक्त भूगोल नाही तर इतिहास पण आहे, पण ह्या इतिहासाला म्हणजे आपल्या गडकिल्ल्यांना सरकार लग्नाला द्यायला निघाले आहेत, तरीही माध्यमं, आणि लोकं थंड बसलेत. राज ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांकडून होत असलेल्या आयातीवर कडाडून टीका केली आहे.  विरोधी पक्षाचा नेता सत्ताधारी पक्षात जाऊन बसतोय, नेते इकडून तिकडे सहज उड्या मारत आहेत, आणि आपण सगळे शांतपणे बघत बसलोय. तुमच्या जगण्यातली प्रत्येक गोष्ट कोण निवडून येणार आहे, ह्यावर सगळं अवलंबून आहे. सरकार म्हणतंय की आम्ही 1 लाख 25 हजार विहिरी बांधल्या. मुंबईत रस्त्यांवर जे खड्डे पडलेत, त्या खड्ड्यांना मुख्यमंत्री 'विहिरी' म्हणत आहेत का? काय बोलतंय सरकार? आणि आता पुन्हा नवीन गोष्टी घेऊन हे सत्ताधारी तुमच्यासमोर येत आहे, जाहीरनामे येणार आणि जाणार, तुम्ही भूलथापांना बळी पडणार, तुमच्या मनात राग आहे का नाही? तुम्ही कधी बोलणार आहात की नाही?, असा प्रश्नही राज ठाकरेंनी जनतेला विचारला आहे. ही निवडणूक मी एवढ्यासाठी लढवतोय की तुमच्या मनातला राग, तुमच्या मनातला सरकारविरोधातला जो राग आहे तो व्यक्त करण्यासाठी ही निवडणूक लढवतोय, आम्हाला निवडून यायचं आहे, कारण सक्षम आणि प्रबळ विरोधी पक्ष नसेल तर सत्ताधारी पक्ष तुम्हाला हवं तसं चिरडून टाकेल, अशी टीकाही राज ठाकरेंनी केली आहे.  

टॅग्स :राज ठाकरेमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019