युतीसाठी आरतीचे ताट घेऊन आलो नव्हतो!
By Admin | Updated: May 8, 2015 23:19 IST2015-05-08T23:19:24+5:302015-05-08T23:19:24+5:30
बंडखोरांना फूस देऊन शिवसेनेने भाजपाचे १० पेक्षा जास्त उमेदवार पाडले. दुसऱ्यांसाठी खोदलेल्या खड्ड्यात ते स्वत: पडले आहेत

युतीसाठी आरतीचे ताट घेऊन आलो नव्हतो!
नवी मुंबई : बंडखोरांना फूस देऊन शिवसेनेने भाजपाचे १० पेक्षा जास्त उमेदवार पाडले. दुसऱ्यांसाठी खोदलेल्या खड्ड्यात ते स्वत: पडले आहेत. सत्ता जाण्यास तेच जबाबदार असून आता भाजपाच्या माथी खापर फोडण्याचा प्रयत्न सुरू आहे. आम्हाला दोष देऊ नका, निवडणुकीत युती करण्यासाठी आम्ही आरतीचे ताट घेऊन तुमच्याकडे आलो नव्हतो, अशी जळजळीत टीका भाजपा आमदार मंदा म्हात्रे यांनी शिवसेनेवर केली आहे.
नेरूळमध्ये झालेल्या शिवसेनेच्या मेळाव्यात उपनेते विजय नाहटा व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी पराभवाचे खापर शिवसेनेवर फोडले होते. भाजपाला अपयश आले असल्यामुळे सत्ता मिळाली नसल्याची खंत व्यक्त केली होती. गुरुवारी वाशीमधील विष्णुदास भावे नाट्यगृहात झालेल्या भाजपा नगरसेवकांच्या सत्कार सोहळ्यात मंदा म्हात्रे यांनी शिवसेना नेत्यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. पराभवाचे खापर आमच्या माथी फोडू नका. आम्ही युती करण्यासाठी तुमच्याकडे आरतीचे ताट घेऊन आलो नव्हतो. तुमचे नेतेच वारंवार फोन करून युती करण्यासाठी मागे लागले होते. एकनाथ शिंदेंसह सर्वांना युती नको, असे मी सांगितले होते. निवडणुकीनंतर एकत्र येऊ असे सांगितले होते. परंतु आमचे न ऐकता युती केली. जिथे जिंकता येणार नाही आणि जिथे आमचे संघटन नाही, असे प्रभाग आम्हाला दिले. आमच्या बहुतांश प्रभागांमध्ये शिवसेनेने बंडखोरी केली. १० पेक्षा जास्त उमेदवार पाडले. शिवसेनेने दुसऱ्यांसाठी खड्डा खोदला व त्या खड्ड्यात ते स्वत:च पडले. आता मात्र भाजपामुळे सत्ता गेल्याची उपरती त्यांना झाली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. ते गणेश नाईकांना संपविण्यास निघाले होते पण नाईकांनी त्यांनाच संपविले. आमच्यावर केलेली टीका सहन केली जाणार नाही. यापुढे आम्ही तुमच्याकडे येत नाही. तुम्ही आमच्याकडे येऊ नका, असेही त्यांनी सुनावले.
भाजपा आमदार संजय केळकर यांनीही शिवसेनेवर टीका केली. सत्ता भाजपामुळे नाही तर शिवसेनेमुळेच गेली आहे. आमचे उमेदवार पाडण्याचे प्रयत्न केले. आम्हाला दोष देऊ नका, आम्ही तोंड उघडले तर पळता भुई थोडी होईल, असेही स्पष्ट केले. डॉ. राजेश पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी संपत शेवाळे, मारुती भोईर, सुषमा दंडे व इतर पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)