Join us  

राजकारणात केवळ एकच शक्यता नाही, सेना-भाजपच्या एकत्र येण्यावर मुनगंटीवारांचे उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2021 9:06 PM

राजकारणात अनेक शक्यता असतात, राजकारणात केवळ एकच शक्यता नाही, ती म्हणजे भाजपा आणि काँग्रेस एकत्र येईल. कारण, हे उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव आहे.

ठळक मुद्देराजकारणात अनेक शक्यता असतात, राजकारणात केवळ एकच शक्यता नाही, ती म्हणजे भाजपा आणि काँग्रेस एकत्र येईल. कारण, हे उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव आहे.

मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या दिल्लीवारीनंतर मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांच्यात गेल्या पाच-सात दिवसांत ४० मिनिटं फोनवर चर्चा झाल्याचं समजतं. या चर्चेदरम्यान मोदींनी उद्धव ठाकरेंसमोर भाजपाचा सत्तास्थापनेचा प्रस्ताव ठेवला असल्याची माहिती दिल्लीतील उच्चपदस्थ सूत्रांनी 'लोकमत'शी बोलताना दिली. त्यावरुन, राजकीय वर्तुळाच पुन्हा युती होणार असल्याची चांगलीच चर्चा सुरू आहे. त्यासंदर्भात भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी आपलं मत स्पष्टपणे मांडलं आहे. तसेच, राजकारणात अनेक शक्यता असतात, असेही ते म्हणाले.

राजकारणात अनेक शक्यता असतात, राजकारणात केवळ एकच शक्यता नाही, ती म्हणजे भाजपा आणि काँग्रेस एकत्र येईल. कारण, हे उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव आहे. एकीकडे देशभक्तीच कडवा विचार आहे, दुसरीकडे खुर्चीप्रेमाचा कडवा विचार आहे. त्यामुळे, देशातील राजकारणातील ध्रुवीकरणात, देशात जे ध्रुवीकरण सुरू झालंय. त्यामुळे, दोन पक्षांच्या युती आघाड्या होऊ शकतात. आम्ही 25 वर्षे युतीत सडलो, आता यापुढे युती होणार नाही, असे शिवसेनेनं जाहीर केलं होतं. पण, एक वर्षातच लोकसभा निवडणुकांवेळी आम्ही एकत्र आलो, असेही सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं. 

भविष्यात काय होऊ शकतो, यावर आज भाष्य करणं योग्य नाही. पण, काँग्रेस ज्यापद्धतीने स्वबळाची भाषा करत आहेत, मंत्रिमंडळात निर्णय घेताना होत असेलला हस्तक्षेप त्यावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना काही निर्णय घ्यायचे असतील, पर्यावरण विषयक काही धोरणात्मक काम करायचं असेल तर, ते जास्त दिवस एकत्र राहतील असे वाटत नाही, असेही मुनगंटीवार यांनी म्हटलं. 

सध्या तरी मला वाटत नाही

राजकारणात चर्चा होत असतात, एक दिन की चर्चा... चर्चा पे चर्चा... होतात. मी माझ्या अनुभवावरुन एक गोष्ट सांगू इच्छितो, चर्चा होत असेल तर चर्चेतून काही निष्पन्न होत नाही. व्हायचं असेल तर ते गुप्तपणे होतं, त्याची माहितीही बाहेर पडत नाही. मला आज तरी, आजच्या वातावरणात भाजपा-शिवसेना एकत्र येतील, असे वाटत नाही. भाजपा-शिवसेनेची गेल्या 30 वर्षांपासूनची युती होती. हिंदुत्व आणि देशप्रेमांचा धागा पकडून ही युती होती. मी एक पक्षाचा छोटा कार्यकर्ता आहे, वरिष्ठ काय चर्चा करतात हे आमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. परंतु, सध्याचं वातावरण पाहता, ही चर्चा गंभीरतेनं घ्यावी, असे मला वाटत नाही, असे सुधीर मुनगंटीवर यांनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्री-पंतप्रधान भेटीत चर्चा

काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. आरक्षण आणि राज्यातील अन्य काही प्रश्नांबाबत ही भेट होती. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अशोक चव्हाण हेही त्यांच्यासोबत होते. पण, या भेटीपेक्षा, नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्यात बंद दाराआड झालेल्या भेटीचीच चर्चा जास्त रंगली होती. महाराष्ट्राच्या राजकारणात काहीतरी मोठं घडणार का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली होती.  

टॅग्स :शिवसेनाउद्धव ठाकरेराजकारण