दोन दिवस प्यायचे पाणीच नाही
By Admin | Updated: June 20, 2015 23:14 IST2015-06-20T23:14:27+5:302015-06-20T23:14:27+5:30
पालघर नगरपरिषदेच्या ठेकेदाराने जेसीबीने सातपाटी, धनसार, शिरगाव गावाला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईनच फोडल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले आहे.

दोन दिवस प्यायचे पाणीच नाही
पालघर : पालघर नगरपरिषदेच्या ठेकेदाराने जेसीबीने सातपाटी, धनसार, शिरगाव गावाला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईनच फोडल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले आहे. त्यामुळे तीन्ही गावाना दोन दिवस पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहावे लागणार आहे.
पालघरच्या २६ गावे नळपाणी पुरवठा योजनेतंर्गत सातपाटी, धनसार, शिरगाव गावाला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. पालघर पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाकडून दररोज सातपाटी गावाला आठ लाख लिटर्स, धनसार गावाला दोन लाख लिटर्स तर शिरगाव गावाला चार लाख लिटर्स असा सुमारे चौदा ते पंधरा लाख लिटर्स पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. शनिवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास पालघर नगरपरिषदेने गटार साफ सफाईचा ठेका दिलेल्या ठेकेदाराच्या जेसीबीने सातपाटीसह तिन्ही गावाना पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फोडली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पिण्याचे पाणी वाहुन गेले. या प्रकारामुळे घटनास्थळी लोक जमु लागल्याने कारवाईच्या भीतीने जेसीबीधारकाने घटनास्थळावरून पळ काढला. या पाईपलाईनचा व्हॉल्व्ह तात्काळ बंद करण्याची काळजी घेण्यापेक्षा जेसीबी चालक पळून गेल्याने या नुकसानापोटी ठेकेदारावर कडक कारवाईची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. (वार्ताहर)