मुंबई- उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून गोपाळ शेट्टींनी मोठ्या मताधिक्क्यानं विजय मिळवला आहे. त्यांनी प्रतिस्पर्धी काँग्रेस ऊर्मिला मातोंडकर यांचा 4 लाखांहून अधिक मतांनी पराभव केला आहे. गोपाळ शेट्टी यांना 6 लाख 13 हजार 288 एवढी मतं मिळाली आहेत. तर ऊर्मिला मातोंडकर यांच्या पारड्यात 195147 मतं पडली आहे. ऊर्मिला मातोंडकर यांनी झालेल्या पराभवानंतर मीडियाकडे प्रतिक्रिया व्यक्ती केली आहे. त्या म्हणाल्या, माझ्यावर विश्वास दाखवलेल्या लोकांचे मी आभार मानते, हीच माझ्या व्यक्तित्वाची ओळख आहे. मी कुठल्याही बाजूनं पराभूत झालेली नाही. काही महिन्याभरापूर्वीच मी राजकारणात आली आणि मी चांगलं प्रदर्शन केलं आहे. मला पराभव झाल्याचं जराही दुःख नाही. मी राजकारणात कायम राहणार आहे. लोकांनी दिलेल्या पाठिंब्यासाठी मी त्यांची आभारी आहे. भाजपालाही त्यांच्या विजयाबद्दल त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. 2014च्या लोकसभा निवडणुकीत उसळलेल्या मोदी लाटेनं उत्तर मुंबई मतदारसंघात काँग्रेसची पार वाट लावली होती. भाजपाचे उमेदवार गोपाळ शेट्टी यांनी काँग्रेस उमेदवार संजय निरुपम यांचा तब्बल 4 लाख 46 हजार 582 मतांनी पराभव केला होता. यावेळी या मतदारसंघात विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी यांच्यापुढे काँग्रेसनं अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर हिच्या रूपानं तगडं आव्हान उभं केलं होतं. ऊर्मिलानं धडाकेबाज प्रचार करून जोरदार हवा केली होती. त्यामुळे इथल्या लढतीकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं होतं. परंतु या निवडणुकीत ऊर्मिला मातोंडकर यांचा पराभव झाला आहे.
महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019: पराभवाचं दुःख नाही, राजकारणात कायम राहणार- ऊर्मिला मातोंडकर
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2019 16:33 IST