Join us

महाराष्ट्रात करोना व्हायरसबाधित एकही रुग्ण नाही, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2020 21:33 IST

महाराष्ट्रात करोना व्हायरसमुळे बाधित झालेला एकही रुग्ण आढळून आलेला नाही.

मुंबई : महाराष्ट्रात करोना व्हायरसमुळे बाधित झालेला एकही रुग्ण आढळून आलेला नाही. सध्या 10 रुग्ण मुंबई, पुणे आणि नांदेड येथे दाखल असून त्यांचे नमुने निगेटिव्ह आले आहेत. 17 प्रवाशांची दूरध्वनीद्वारे विचारपूस केली जात आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आतापर्यंत 4600 प्रवाशांचे स्क्रिनिंग करण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे दिली.

राज्यात सध्या 27 प्रवाशी निरिक्षणाखाली असून त्यातील 10 प्रवाशांना खबरदारीचा उपाय म्हणून रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यातील सहा जणांना मुंबई येथे, तीन जणांना पुणे येथे आणि एकाला नांदेड येथे दाखल करण्यात आले आहे. या दहा जणांचे नमुने एनआयव्हीकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी सहा जणांचे नमुने निगेटिव्ह आले आहे.उर्वरित चार जणांच्या नमुन्यांचा अहवाल अद्याप येणे बाकी आहे. तीन जणांचे नमुने दुसऱ्यांदा तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. त्यांचाही अहवाल अद्याप अप्राप्त आहे. उर्वरित 17 प्रवाशांची दूरध्वनीद्वारे रोज विचारपूस केली जात आहे. ‘करोना’ रुग्णांसाठी मुंबईत कस्तुरबा आणि पुणे येथे नायडू रुग्णालयात विलगीकरण कक्ष करण्यात आले आहेत.