वांद्रेकोंड गावात रस्ताही नाही!
By Admin | Updated: January 25, 2015 22:41 IST2015-01-25T22:41:55+5:302015-01-25T22:41:55+5:30
देशाचा ६५ वा प्रजासत्ताक दिन साजरा होत असताना राज्यात आजही अनेक गावांना रस्ते, पाणी, वीज या मूलभूत गरजांकरिता संघर्ष करावा लागत आहे

वांद्रेकोंड गावात रस्ताही नाही!
सिकंदर अनवार, दासगांव
देशाचा ६५ वा प्रजासत्ताक दिन साजरा होत असताना राज्यात आजही अनेक गावांना रस्ते, पाणी, वीज या मूलभूत गरजांकरिता संघर्ष करावा लागत आहे. यामुळेच अनेकांना आजही आपण पारतंत्र्यात असल्याची जाणीव होत आहे. महाड तालुक्यातील दासगाव गावाच्या वांद्रेकोंडला जाण्याकरिता आजही रस्ता नाही. कच्चा रस्तादेखील अपूर्ण असल्याने येथील ग्रामस्थांचे होणारे हाल या गावात गेल्याशिवाय प्रशासनाला आणि लोकप्रतिनिधींना कळणार नाहीत.
महाड तालुक्यातील दासगाव गावाची वांद्रेकोंड ही वाडी दासगावपासून जवळपास सात किमी अंतरावर डोंगरावर वसली आहे. उंच डोंगरावर आणि झाडीतून मार्ग काढत या वाडीवर जावे लागते. गेली अनेक वर्षे येथील ग्रामस्थ रस्त्याची मागणी करीत आहेत, मात्र त्याकडे दुर्लक्ष होत आहे. आजपर्यंत या रस्त्याकरिता विविध खासदारांच्या फंडातून लाखो रुपये खर्ची पडले, मात्र रस्ता काही झाला नाही. मोठी जोखीम घेत येथील काही तरुण मोटारसायकल घेवून वांद्रेकोंडपर्यंत जातात, मात्र ते देखील धोक्याचे आहे. या वाडीवर रस्ता होत नसल्याने आणि विविध सुविधा तसेच खरेदीकरिता सात किमीची पायपीट करावी लागत असल्याने येथील ३२ घरांपैकी आता केवळ २५ घरेच शिल्लक राहिली आहेत. १२ घरांतील कुटुंबांनी नवीकोंडावर येऊन येथे घरे बांधून राहणे पसंत केले. शिल्लक राहिलेल्यांपैकी अनेकजण मोठ्या शहरात कामाला असल्याने या ठिकाणी केवळ वृद्ध महिला, पुरुषच अधिक आहेत.
वांद्रेकोंडावर जाण्याकरिता असलेला उंच चढ आणि उतार यामुळे चालणे देखील कठीण होते. रस्त्याच्या मागणीकडे प्रशासनाबरोबरच येथील स्थानिक लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष झाले आहे. यामुळे येथील ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.