जेलीफिशचा धोका नाही

By Admin | Updated: August 29, 2014 01:10 IST2014-08-29T01:10:34+5:302014-08-29T01:10:34+5:30

गणरायाच्या आगमनासाठी मुंबापुरी सज्ज झाली आहे. ३० आॅगस्टला दीड दिवसाच्या, नंतर ५ दिवसांच्या, ७ दिवसांच्या आणि अनंत चतुर्दशीला मुंबईच्या समुद्रकिनारी लाखो गणेशमूर्तींचे विसर्जन होणार आहे

There is no risk of jellyfish | जेलीफिशचा धोका नाही

जेलीफिशचा धोका नाही

अंधेरी : गणरायाच्या आगमनासाठी मुंबापुरी सज्ज झाली आहे. ३० आॅगस्टला दीड दिवसाच्या, नंतर ५ दिवसांच्या, ७ दिवसांच्या आणि अनंत चतुर्दशीला मुंबईच्या समुद्रकिनारी लाखो गणेशमूर्तींचे विसर्जन होणार आहे. गेल्या वर्षी विसर्जनावेळी सुमारे ७० मुंबईकरांना जेलीफिशने चावा घेतला होता.
सध्या तरी जेलीफिशचा धोका सुमद्रकिनारी नसला तरी सतर्कतेचा इशारा म्हणून मुंबई महापालिकेने शासनाच्या मत्स्यविभागाच्या मदतीने मुंबईतील विविध समुद्रकिनाऱ्यांवर जेलीफिश आहेत का, याची आणि समुद्राच्या पाण्याची पाहणी केल्याची माहिती महापौर सुनील प्रभू यांनी ‘लोकमत’ला दिली. गणेशोेत्सवासाठी पालिका सज्ज झाली असून विसर्जनावेळी पालिकेने विविध समुद्रकिनारी डॉक्टरांसह रुग्णवाहिका, जीवरक्षक आणि स्थानिक कोळी बांधवांची फौजच तैनात केली आहे.
पालिकेने मढ येथील कोळी बांधवांच्या मदतीने आक्सा समुद्रकिनारी पाहणी केली. यावेळी तेथे जेलीफिश आढळले नसल्याचे पालिकेच्या पी(उत्तर) विभागाचे साहाय्यक आयुक्त देवेंद्रकुमार जैन यांनी सांगितले. आक्सा हा धोकादायक बीच असल्यामुळे गणेशभक्तांनी विसर्जनावेळी पाण्यात उतरू नये, असे फलक येथे ठिकठिकाणी लावण्यात आल्याचेही जैन यांनी सांगितले. सध्या तरी मुंबईच्या समुद्रकिनाऱ्याला जेलीफिशचा धोका नसल्याची माहिती मत्स्यशास्त्रज्ञ सदाशिव राजे यांनी दिली. समुद्राच्या पाण्याबरोबर मुंबईच्या विविध समुद्रकिनारी निळ्या रंगाचे विषारी जेलीफिश भरतीवेळी येतात. आक्सा बीचवर १५ दिवसांपूर्वी ३-४ पर्यटकांना जेलीफिशने चावा घेतला. समुद्राच्या पाण्याचा रंग निळा आणि जेलीफिश हादेखील निळ्या रंगाच्या फुग्यासारखा असल्यामुळे पाण्यात उतरल्यास पर्यटकांना समजून येत नाही. (प्रतिनिधी)

Web Title: There is no risk of jellyfish

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.