वसई तालुक्यात २ महिने रेशन नाही
By Admin | Updated: December 19, 2014 23:35 IST2014-12-19T23:35:13+5:302014-12-19T23:35:13+5:30
वसई तालुक्यातील पेल्हार, मेढे, तिल्हेर येथील आदिवासी नागरीक जास्त प्रमाणात असलेल्या गावात दोन महिन्यांपासून तांदूळ,

वसई तालुक्यात २ महिने रेशन नाही
पारोळ : वसई तालुक्यातील पेल्हार, मेढे, तिल्हेर येथील आदिवासी नागरीक जास्त प्रमाणात असलेल्या गावात दोन महिन्यांपासून तांदूळ, गव्हाच्या रुपात मिळणारे रेशन न आल्याने नागरीकांवर उपासमारीची वेळ आली आहे.
केंद्राने अन्नविधेयक मंजूर केले. प्रत्येक गरजूला अन्नधान्य मिळावे व कुणीही उपाशी राहू नये हा या विधेयकामागील हेतू होता. पण तो हेतू ग्रामीण भागात साध्य होताना दिसत नाही. वसई तालुक्याचा विचार केला असता या तालुक्यात मोठ्या प्रमाणात सरकारी कोट्यातील अन्य धान्य काळ््याबाजारात विकण्याला उत आला आहे. नालासोपारा येथे ३३ क्विं. तांदुळ, ७७ क्विं. गहू आणि १५ हजार ली. रॉकेल असा मोठ्या अवैध साठापुरवठा विभागाने जप्त केला त्यामुळे रेशनिंगच्या वाटपामध्ये कुठेतरी पाणी मुरत असल्याचे दिसते आहे.
तिल्हेर, मेढे, पेल्हार ही गावे आदिवासी बहुल असून या गावातील अनेक कुटुंबे दारिद्र्यरेषेखालील आहेत. त्यामुळे त्यांची चूल ही या रेशनच्या अन्नधान्यावर पेटते. तसेच वीटभट्टी, रेती हे व्यवसाय बंद झाल्याने त्यांना उपजिवीकेचे साधनच नाही. त्यामुळे त्यांना रेशनिंग धान्याचा आधार घ्यावा लागतो. परिणामी सरकार तुपाशी व जनता उपाशी अशी स्थिती येथे आहे.
अन्नपुरवठा विभागाकडे आम्ही अनेक वेळा फेऱ्या मारल्या पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. उलट अनेकदा फेऱ्या मारल्याने वेळ व पैसा खर्च होतोच पण रेशन न मिळाल्याने जनतेचा रोषही आम्हाला सहन करावा लागतो असे दुकानदाराने सांगितले.