पाणी नाही तर मतदान नाही
By Admin | Updated: October 7, 2014 23:56 IST2014-10-07T23:56:26+5:302014-10-07T23:56:26+5:30
आठवडाभरापासून अंबरनाथच्या पश्चिम भागात पाणीपुरवठा सुरळीत नसल्याने आता येथील नागरिक संतापले आहेत.

पाणी नाही तर मतदान नाही
अंबरनाथ : आठवडाभरापासून अंबरनाथच्या पश्चिम भागात पाणीपुरवठा सुरळीत नसल्याने आता येथील नागरिक संतापले आहेत. पाणी नाही तर मतदान न करण्याचा निर्णय खुंटवली परिसरातील नागरिकांनी घेतला आहे.
अंबरनाथ शहराला पाणीपुरवठा बदलापूरच्या बॅरेज धरणातून होतो. मात्र, बदलापूरला पंपिंगमध्ये बिघाड होत असल्याने अंबरनाथला पाणीपुरवठा कमी प्रमाणात होत असल्याचे अधिकारी गेल्या आठवडाभरापासून सांगत आहेत. मात्र, ही समस्या सुटत नसल्याने आता नागरिकांचा संताप वाढला आहे. खुंटवली परिसरात तीव्र पाणीटंचाई असल्याने येथील नागरिकांनी पाणीसमस्येसाठी स्थानिक नगरसेविका मनीषा वाळेकर आणि शिवसेना शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांच्याकडे दाद मागितली. अखेर, वाळेकर यांनी अधिकाऱ्यांनाच खुंटवली परिसरात बोलवले आणि पाणीसमस्येचे कारण काय आणि कधी सुटणार, याचा जाब विचारला.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता अजय सिंग यांना पाहताच नागरिकांनी त्यांना घेराव घालत पाणीसमस्या तत्काळ सोडविण्याची मागणी केली. सिंग यांनी येत्या काही दिवसांत ही समस्या सोडविण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असल्याचे स्पष्ट केले. मात्र, संतापलेल्या नागरिकांनी तडकाफडकी निर्णय घेत अधिकाऱ्यांना बजावले की, पाणी नाही मिळाले तर आम्ही मतदानावर बहिष्कार घालणार आहोत. या बहिष्काराच्या निर्णयानंतर अधिकाऱ्यांनी नागरिकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, नागरिकांनी आपला निर्णय कायम ठेवत अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.