फेरीवाल्यांमध्ये बचत गटाला स्थान नाही!
By Admin | Updated: December 23, 2014 01:28 IST2014-12-23T01:28:36+5:302014-12-23T01:28:36+5:30
महिला सक्षमीकरणासाठी स्वयंरोजगार, महिला बचत गट या योजनांना प्रोत्साहन देण्यासाठी पालिकेचे प्रयत्न सुरू आहेत़

फेरीवाल्यांमध्ये बचत गटाला स्थान नाही!
मुंबई : महिला सक्षमीकरणासाठी पालिकेने २००७ मध्ये खास जेंडर बजेट आणले़ या अंतर्गत महिला बचत गटांना प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक मदत करण्याचे धोरण ठरले़ परंतु फेरीवाल्यांची जागा निश्चित करताना त्यात महिला बचतगटांच्या वस्तूच्या विक्रीसाठी आरक्षण देण्यास प्रशासनाने नकारघंटा वाजविली आहे़
महिला सक्षमीकरणासाठी स्वयंरोजगार, महिला बचत गट या योजनांना प्रोत्साहन देण्यासाठी पालिकेचे प्रयत्न सुरू आहेत़ त्याचवेळी नवीन फेरीवाला धोरणही अंतिम टप्प्यात असल्याने महिला सामाजिक संस्था व महिला विक्री संघाच्या उत्पादनांच्या विक्रीकरिता दहा टक्के आरक्षण देण्याची मागणी आमदार व नगरसेविका मनीषा चौधरी यांनी पालिका प्रशासनाकडे केली होती़ मात्र कायद्यावर बोट ठेवून आयुक्तांनी ही मागणी फेटाळली आहे़ पदपथावरील विक्रेते अधिनियम २०१४, कलम ७ अन्वये शहर फेरीवाला समितीने फेरीवाला नोंदणी करताना अनुसूचित जाती/जमाती, इतर मागासवर्गीय समाज, स्त्रिया, अल्पसंख्याकांना प्राधान्य देण्यात आले आहे़(प्रतिनिधी)