Join us  

मुंबईत कोरोनाची दुसरी लाट नाही; अनलॉक कधी होणार? आयुक्तांनी सांगितली डेडलाईन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2020 6:24 AM

कॉन्फेडरेशन आॅफ इंडियन इंडस्ट्रिजमार्फत आयोजित परिषदेत ‘कोरोनाविरुद्ध लढा व पुढील वाटचाल’ या विषयावर बोलताना आयुक्तांनी ही माहिती दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : गेल्या महिन्याभरापासून मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मात्र, कोरोनाची दुसरी लाट आलेली नसून, चाचण्या वाढल्यामुळेच रुग्णसंख्येत वाढ दिसून येत आहे. याउलट मुंबईकरांचे सहकार्य मिळाल्यास कोरोनाचा प्रसार लवकरच नियंत्रणात येऊन फेब्रुवारी, २०२१ पर्यंत मुंबई पूर्णपणे अनलॉक करता येईल, असा दिलासा पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिला. कॉन्फेडरेशन आॅफ इंडियन इंडस्ट्रिजमार्फत आयोजित परिषदेत ‘कोरोनाविरुद्ध लढा व पुढील वाटचाल’ या विषयावर बोलताना आयुक्तांनी ही माहिती दिली.

१ सप्टेंबरपासून मुंबईत दररोज सरासरी दोन हजारांहून अधिक रुग्ण आढळून येत आहेत. मात्र, यापूर्वी सात हजार चाचण्या केल्यानंतर १,१०० बाधित रुग्ण आढळून येत होते. आता १५ हजार चाचण्या दररोज करूनही सरासरी दोन हजार रुग्ण आढळूनयेत आहेत. ही कोरोनाची दुसरी लाट नसून, चाचण्यांचे प्रमाण दुप्पट केल्यामुळे रुग्णवाढ दिसत असल्याचा दावा आयुक्तांनी केले.याउलट गेल्या महिन्याभरात मुंबईत कोरोना मृत्युंचे प्रमाण २.२ टक्क्यांनी कमी झाले आहे. सध्या मुंबईतील कोरोना मृत्यूचे प्रमाण ४.५ टक्के आहे. रुग्ण वाढले, तरी त्यांना आवश्यक आरोग्य सुविधा देण्यास पालिका सक्षम असल्याचेही आयुक्तांनी सांगितले.

दरम्यान, मुंबईत जीम आणि रेस्टॉरंट सुरू करण्याबाबत संबंधितांशी चर्चा सुरू आहे. यामध्ये एक तृतीयांश उपस्थिती ठेवून जीम-रेस्टॉरंट सुरू करण्याबाबत विचार सुरू आहे. त्यानंतरच्या टप्प्यात धार्मिक स्थळे सुरू करण्याबाबत निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.चाचण्यांचे प्रमाण वाढविणारगेल्या महिन्याभरात मुंबईतील दररोजच्या चाचण्यांचे प्रमाण सात हजारांवरून १५ हजारांवर नेण्यात आले आहे. येत्या काही दिवसांत हे प्रमाण २० हजारांपर्यंत नेण्याचे लक्ष्य पालिकेने ठेवले आहे. मुंबईत दररोज ३२ हजार चाचण्या केल्यानंतर त्यात चार हजार बाधित आढळले, तरी त्यांना आवश्यक आरोग्य सुविधा देण्यासाठी पालिकेची यंत्रणा सक्षम असल्याची हमी आयुक्तांनी दिली. 

जबाबदारीने वागणे गरजेचेअनेक ठिकाणी नागरिक मास्क घातल्याशिवाय फिरत असल्याबद्दल आयुक्तांनी चिंता व्यक्त केली. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनीही जबाबदारीने वागणे आवश्यक आहे. नागरिकांचे सहकार्य मिळाल्यास, कोरोना लवकरच नियंत्रणात येऊन फेब्रुवारी, २०२१पर्यंत मुंबई पूर्णपणे अनलॉक करता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसकोरोना सकारात्मक बातम्या