Join us  

फेरीवाल्यांची काहीही चूक नाही, प्रत्येकाला पोट भरण्याचा अधिकार - नाना पाटेकर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 04, 2017 5:26 PM

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी फेरीवाल्यांवर करण्यात असलेल्या कारवाईला विरोध केला आहे. गरीब बिचाऱ्या फेरीवाल्यांची काहीही चूक नाही, प्रत्येकाला पोट भरण्याचा अधिकार असल्याचं नाना पाटेकर बोलले आहेत.

ठळक मुद्देनाना पाटेकर यांनी फेरीवाल्यांवर करण्यात असलेल्या कारवाईला विरोध केला आहे'गरीब बिचाऱ्या फेरीवाल्यांची काहीही चूक नाही, प्रत्येकाला पोट भरण्याचा अधिकार''यात फेरीवाल्यांची काही चूक नाही. चूक तुमची आमची आहे'

मुंबई - ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी फेरीवाल्यांवर करण्यात असलेल्या कारवाईला विरोध केला आहे. गरीब बिचाऱ्या फेरीवाल्यांची काहीही चूक नाही, प्रत्येकाला पोट भरण्याचा अधिकार असल्याचं नाना पाटेकर बोलले आहेत. माटुंग्याच्या व्हीजेटीआय कॉलेजच्या टेक्नोवन्झा फेस्टिव्हलमध्ये ते बोलत होते. यावेळी नाना पाटेकर यांनी फेरीवाल्यांवर करण्यात येत असलेल्या कारवाईवर भाष्य केलं. नाना पाटेकर यांनी फेरीवाल्यांचं समर्थन केल्याने अनेकांना मात्र आश्चर्य वाटत आहे. दरम्यान फेरीवाल्यांच्या कारवाईला विरोध करणारे मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी नाना पाटेकर यांचे आभार मानले आहेत. 

नाना पाटेकर बोलले आहेत की, 'मला काल कोणीतरी विचारलं की, फेरीवाल्यांना असं रस्त्यावरुन हुसकावून लावणं, मारणं योग्य आहे का ? माझं एकच म्हणणं आहे, सगळ्यांना जगण्याचा अधिकार आहे. अतिक्रमण नसावं वैगेरे सगळं मान्य आहे. माझी एक साधी वृत्ती अशी आहे की, मी जर माझ्या दोनवेळच्या भाकरीसाठी आज काम करत असेन, आणि ते काम मला नसेल तर मग काय मी काय करेन, तुम्ही खात असाल तर तुमच्या हातचं हिसकावून घेईन. त्यामुळे मला काम करु द्या. यात फेरीवाल्यांची काही चूक नाही. चूक तुमची आमची आहे. इतकी वर्ष का नाही कार्पोरेशननं डिमार्केशन केलेली ? आपण कॉर्पोरेशनला विचारलं का ?'. 

महत्वाचं म्हणजे फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी अल्टिमेटम देणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि नाना पाटेकर यांचे चांगले संबंध आहेत. अनेकदा नाना पाटेकर यांनी जाहीर कार्यक्रमांतून राज ठाकरेंच्या शैलीचं कौतुक केलं आहे. त्यामुळे आता नाना पाटेकर यांनी फेरीवाल्यांची बाजू घेतल्याने, कारवाईसाठी आग्रह करणारे राज ठाकरे काय प्रतिक्रिया देतात हे पाहावं लागणार आहे. 

राज ठाकरेंनी दिला होता 15 दिवसांचा अल्टिमेटमएलफिन्स्टन दुर्घटनेनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुंबईतील मेट्रो सिनेमा ते चर्चगेट रेल्वे स्टेशनपर्यंत मोर्चा काढून रेल्वे स्टेशन परिसर फेरीवाला मुक्त करण्यासाठी 15 दिवसांची मुदत दिली होती.  ही डेडलाइन संपल्यानंतर ठाणे, कल्याणसह अनेक ठिकाणी मनसे कार्यकर्त्यांनी मनसे स्टाईलने आंदोलन सुरु केलं होतं. याप्रकरणी पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांवर कारवाई करण्यासही सुरुवात केली होती. राज ठाकरे यांनी मात्र फेसबुकच्या माध्यमातून आपल्या कार्यकर्त्यांचं समर्थन केलं होतं. जिथे जिथे अन्याय, गैरप्रकार दिसेल तिथे महाराष्ट्र सैनिकाची लाथ बसणारच असं राज ठाकरे यांनी ठणकावून सांगितलं होतं.

सुशांत माळवदे यांच्यावर जीवघेणा हल्ला मालाड पश्चिम मनसे विभाग अध्यक्ष सुशांत माळवदे यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता. फेरीवाल्यांनी रॉडने सुशांत माळवदे यांच्यावर हल्ला केला. हल्ल्यात सुशांत माळवदे गंभीर जखमी झाले होते. त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली होती. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रुग्णालयात जाऊन सुशांत माळवदे यांची भेट घेतली होती. सुशांत माळवदे मारहाण प्रकरणी 7 फेरीवाल्यांविरोधात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला. 

टॅग्स :नाना पाटेकरफेरीवालेराज ठाकरेएलफिन्स्टन चेंगराचेंगरी