नागरिकांच्या व्यक्तिस्वातंत्र्यात ढवळाढवळ नको
By Admin | Updated: August 22, 2015 01:06 IST2015-08-22T01:06:49+5:302015-08-22T01:06:49+5:30
जनतेच्या व्यक्ती स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचे अधिकार पोलिसांना नाहीत. त्यामुळे चारभिंतींआड जोडपी काय करतात, सार्वजनिक ठिकाणी कसे वागतात

नागरिकांच्या व्यक्तिस्वातंत्र्यात ढवळाढवळ नको
मुंबई : जनतेच्या व्यक्ती स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचे अधिकार पोलिसांना नाहीत. त्यामुळे चारभिंतींआड जोडपी काय करतात, सार्वजनिक ठिकाणी कसे वागतात, काय कपडे घालतात याकडे लक्ष देऊ नका, थोडक्यात जनतेला नैतिकतेचे धडे देऊ नका,, असे आदेश मुंबईचे पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी दिले आहेत. त्यानंतरही नैतिकता शिकवणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी बजावले.
एका विशेष पत्रकाद्वारे मारिया यांनी या सूचना शहरातील पोलीस ठाण्यांना धाडल्या आहेत. त्यात त्यांनी अधिकार नसतानाही पोलिसांनी नागरिकांच्या व्यक्ती स्वातंत्र्यात ढवळाढवळ केल्याच्या घटना घडल्याची कबुली दिली आहे. आक्सा, मढ किनाऱ्यांवरील लॉजमध्ये धाडी घालून मालवणी पोलिसांनी १३ जोडप्यांवर कारवाई केली होती. या कारवाईनंतर व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येते, अशी ओरड झाली होती. तसेच या प्रकरणी उच्च न्यायालयात जनहित याचिकाही दाखल करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)