सरकारवर टीका करण्याचा उद्देश नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 05:49 AM2018-05-18T05:49:07+5:302018-05-18T05:49:07+5:30

यंदाच्या पावसाळ्यात मुंबईत पाणी तुंबल्यास त्यासाठी मेट्रो रेल्वेच्या कामांना जबाबदार ठरवून भाजपाचा रोष ओढावून घेणारे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी आज तलवार म्यान केली.

There is no intention of criticizing the government | सरकारवर टीका करण्याचा उद्देश नाही

सरकारवर टीका करण्याचा उद्देश नाही

Next

मुंबई : यंदाच्या पावसाळ्यात मुंबईत पाणी तुंबल्यास त्यासाठी मेट्रो रेल्वेच्या कामांना जबाबदार ठरवून भाजपाचा रोष ओढावून घेणारे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी आज तलवार म्यान केली. सरकारवर टीका करण्याचा उद्देश नव्हता, आपण नालेसफाईच्या पाहणी दौऱ्यातील वस्तुस्थिती मांडल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
पावसाळ्याला अवघे काही दिवस उरले असल्याने नालेसफाई वेगाने सुरू आहे. ३१ मे ही नालेसफाईच्या कामाची डेडलाइन असल्याने महापौरांनी बुधवारी या कामांची पाहणी केली. नालेसफाईची जेमतेम ४५ टक्के कामे झाली असल्याने डेडलाइनपूर्वी ही कामे पूर्ण करण्याचे आव्हान महापालिकेपुढे आहे. मात्र महापौरांनी मेट्रोच्या कामांकडे बोट दाखवत राज्य सरकारवर निशाणा साधला. मुंबईत पाणी तुंबल्यास मेट्रोची कामे जबाबदार असतील, असा आरोप महापौरांनी केला होता. यास भाजपाने प्रत्युत्तर दिले होते.
महापौरांच्या या विधानाचा भाजपाच्या गटनेत्यांनी समाचार घेतला होता. याबाबत महापौरांना गुरुवारी विचारले असता त्यांनी सपशेल माघार घेतली. राज्य सरकारवर टीका करण्याचा कोणताही उद्देश नव्हता. मुंबईत अनेक ठिकाणी खोदकामे करण्यात आल्याने पावसाळ्यात या ठिकाणी पाणी साचून मुंबईकरांचे जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्य सरकारने प्राधिकरणांकडून पावसाळ्यापूर्वी कामे करून घ्यावीत, एवढेच आपण म्हटल्याचे सांगितले.
>भाजपाचा टोला : ‘करून दाखवले’ असे म्हणणाºयांनी आता पळून दाखवले आहे, असा टोला मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अ‍ॅड. आशिष शेलार यांनी नालेसफाईच्या विषयावरील महापौरांच्या वक्तव्यावर लगावला आहे. युवासेना प्रमुखांनी नुकतीच आयुक्तांकडे एक बैठक घेतली. गच्चीवरील हॉटेल्सला मान्सून शेड टाकता यावी म्हणून ही बैठक घेण्यात आली. त्यांना मान्सून शेडची चिंता वाटते, मान्सूनपूर्व कामांची काळजी वाटत नाही, असा चिमटाही त्यांनी काढला.

Web Title: There is no intention of criticizing the government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.