नारायण राणेंवर तूर्तास कठोर कारवाई नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:06 AM2021-09-18T04:06:19+5:302021-09-18T04:06:19+5:30

नाशिक एफआयआर प्रकरण : राज्य सरकारचे उच्च न्यायालयाला आश्वासन लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबतच्या अवमानकारक ...

There is no immediate action against Narayan Rane | नारायण राणेंवर तूर्तास कठोर कारवाई नाही

नारायण राणेंवर तूर्तास कठोर कारवाई नाही

Next

नाशिक एफआयआर प्रकरण : राज्य सरकारचे उच्च न्यायालयाला आश्वासन

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबतच्या अवमानकारक वक्तव्यासंदर्भात नाशिक येथे दाखल केलेल्या गुन्ह्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर ३० सप्टेंबरपर्यंत कठोर कारवाई करणार नाही, असे आश्वासन राज्य सरकारने उच्च न्यायालयाला शुक्रवारी दिले. तर नाशिकव्यतिरिक्त अन्य ठिकाणी दाखल केलेल्या गुन्ह्यांप्रकरणी स्वतंत्र याचिका दाखल करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने राणे यांना दिले.

वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी नारायण राणे यांच्यावर राज्यात सहा ठिकाणी गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. मुख्यमंत्र्यांबद्दल वादग्रस्त विधान केल्याबाबत राणे यांच्यावर महाड, नाशिक,पुणे, ठाणे, जळगाव आणि अहमदनगर येथे गुन्हा दाखल करण्यात आले. या सहाही ठिकाणी दाखल गुन्हे रद्द करावे, यासाठी राणे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवरील सुनावणी न्या. एस. एस. शिंदे व न्या. एन. जे. जमादार यांच्या खंडपीठापुढे होती.

शुक्रवारच्या सुनावणीत न्यायालयाने म्हटले की, प्रत्येक ठिकाणी दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यासाठी स्वतंत्र याचिका दाखल करा. त्यामुळे सरकारी वकिलांना प्रत्येक पोलीस ठाण्याकडून सूचना घेणे सोपे होईल, असे न्यायालयाने म्हटले.

न्यायालयाची ही सूचना राणे यांचे वकील अशोक मुंदर्गी व ॲड.अनिकेत निकम यांनी मान्य करत राणे यांना अटकेपासून तात्पुरते संरक्षण देण्याची विनंती न्यायालयाला केली. नाशिक सायबर पोलीस सेलने दाखल केलेल्या गुन्ह्याप्रकरणी अटक करणार नसल्याची हमी याआधी सरकारी वकिलांनी दिली आहे. तीच हमी त्यांनी अन्य ठिकाणी नोंदवण्यात आलेल्या गुन्ह्यांसाठी द्यावी, अशी विनंती मुंदर्गी यांनी न्यायालयाला केली.

आधी आम्ही अन्य याचिकांवर सुनावणी घेऊ मगच दिलासा देण्याबाबत विचार करू. पुढील सुनावणीपर्यंत नाशिक प्रकरणी राणे यांच्यावर कठोर कारवाई न करण्याबाबत सरकारने केलेले विधान कायम राहील, असे स्पष्ट करत न्यायालयाने पुढील सुनावणी ३० सप्टेंबर रोजी ठेवली.

सरकारी वकील जयेश याग्निक यांनी न्यायालयाला सांगितले की, नारायण राणे यांनी नाशिक पोलिसांना तपासात सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. ते २५ सप्टेंबर रोजी नाशिक पोलीस ठाण्यात जबाब नोंदवण्यासाठी हजर राहणार आहेत. तर मुंदर्गी यांनी न्यायालयाला सांगितले की, राणे २५ सप्टेंबर रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे नाशिक पोलीस ठाण्यात हजर राहणार आहेत.

Web Title: There is no immediate action against Narayan Rane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.