Join us
Daily Top 2Weekly Top 5

भायखळा कारागृहातील धान्याच्या नमुन्यांतही दोष नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 04:32 IST

कैदी विषबाधा प्रकरणात एफडीएकडून अहवाल सादर

- स्नेहा मोरे मुंबई : भायखळा कारागृहातील कैद्यांना झालेल्या विषबाधेबाबत पालिकेने पाण्याच्या नमुन्यांना क्लीन चिट दिली असताना अन्न व औषध प्रशासन विभागानेही अन्नधान्याच्या नमुन्यांत कसलाही दोष नसल्याचा निर्वाळा दिला आहे. त्यामुळे विषबाधा नेमकी कशामुळे झाली, याचा उलगडा अद्याप झालेला नाही. आता डॉक्सिसायक्लीन या औषधाच्या नमुन्याच्या अहवालाची प्रतीक्षा असून २६ जुलैला तो मिळेल, असे सांगण्यात आले.शुक्रवार सकाळपासून सुमारे ८६ महिला कैद्यांना विषबाधा झाली असून अद्याप त्यापैकी ७ जणींवर जे.जे. रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कैद्यांना झालेल्या विषबाधेबाबत मुंबई महापालिका प्रशासनाने घेतलेल्या पाण्याच्या नमुन्यांत कोणताही दोष नसल्याची माहिती पालिका आरोग्य खात्याच्या कार्यकारी अधिकारी डॉ. पद्मजा केसकर यांनी यापूर्वीच दिली होती. त्यानंतर आता मंगळवारी कारागृहातील अन्नधान्यांच्या तपासाअंती त्यात कुठलाही दोष आढळून आला नसल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहआयुक्त (अन्न) शैलेश आढाव यांनी दिली. तर डॉक्सिसायक्लीन या औषधाच्या नमुन्याविषयीचा अहवाल २६ जुलै रोजी अपेक्षित असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहआयुक्त (औषध) दा. रा. घाणे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.सात जणींची प्रकृती स्थिरभायखळा तुरुंग विषबाधा प्रकरणातील एकूण सात रुग्ण सध्या जे.जे. रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यात चार महिला कैदी, दोन पुरुष कैदी आणि एका १ वर्षाच्या लहानग्याचा समावेश आहे. या सर्वांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती जे.जे. रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय सुरासे यांनी दिली.कारागृह प्रशासनाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्हजेलमधील विषबाधेप्रकरणी ‘एफडीए’च्या पथकाने आपला अहवाल हा प्रत्यक्ष शिजविलेल्या अन्नाच्या नमुन्यातून दिलेला नाही; तर कैद्यांच्या आहारासाठी गहू, तांदूळ, सोयाबीन तेल, पोहे, डाळी या अन्नधान्यांचे कच्चे नमुने घेतले होते. शिजविलेले अन्न मर्यादित प्रमाणात बनविले जाते, त्यामुळे ते संपले, असे कारण जेल प्रशासनाने दिले होते. त्या दिवशी बनविलेले अन्न थोडेही शिल्लक न ठेवणे, ही बाब संशयास्पद वाटत असून त्यामुळे त्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

टॅग्स :तुरुंगमुंबईअन्नातून विषबाधाएफडीए