वडाळा रोड ते बॅलार्ड पियर प्रस्तावावर निर्णय नाहीच

By Admin | Updated: May 11, 2015 01:00 IST2015-05-11T00:51:58+5:302015-05-11T01:00:34+5:30

सीएसटीवरील ताण कमी करण्यासाठी हार्बरचा विस्तार बॅलार्ड पियरपर्यंत करण्याचा निर्णय एमआरव्हीसीने (मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन) घेतला आहे.

There is no decision on Wadala road to Ballard Pier proposal | वडाळा रोड ते बॅलार्ड पियर प्रस्तावावर निर्णय नाहीच

वडाळा रोड ते बॅलार्ड पियर प्रस्तावावर निर्णय नाहीच

मुंबई : सीएसटीवरील ताण कमी करण्यासाठी हार्बरचा विस्तार बॅलार्ड पियरपर्यंत करण्याचा निर्णय एमआरव्हीसीने (मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन) घेतला आहे. यासाठी मुंबई पोर्ट ट्रस्टच्या जमिनीचा वापर केला जाणार असून, अद्याप त्यावर तोडगा निघालेला नसल्याचे रेल्वेतील सूत्रांनी सांगितले.
सीएसटी ते अंधेरी तसेच पनवेल, वाशीपर्यंत हार्बरचा पसारा आहे. अंधेरीपर्यंत असलेली हार्बर गोरेगाव आणि त्यानंतर बोरीवलीपर्यंत वाढविण्यात येणार आहे. गोरेगावपर्यंत विस्ताराचा प्रकल्प एमयूटीपी-२मध्ये तर बोरीवलीपर्यंत विस्ताराचा प्रकल्प एमयूटीपी-३मध्ये समावेश करण्यात आला आहे. यातील हार्बरवरील गोरेगावपर्यंत विस्तार करण्याचे काम सुरू असून, येत्या काही महिन्यांत ते पूर्ण होईल, अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांकडून वारंवार देण्यात येत आहे. या प्रकल्पात ओशिवरा या नवीन स्थानकाचा समावेश केला जाणार आहे. डाऊन दिशेला हार्बरचा विस्तार होत असतानाच अप दिशेला बॅलार्ड पियरपर्यंत त्याचा विस्तार करण्याचा निर्णय एमआरव्हीसीने घेतला आहे. या प्रकल्पानुसार वडाळा स्थानक हा बॅलार्ड पियरला जोडण्यात येईल. प्रकल्पाचा एमयूटीपी-३मध्ये नव्याने समावेश करण्यात आला असून, प्रकल्पासाठी मुंबई पोर्ट ट्रस्ट्रची जमीन लागणार आहे. त्यासाठी पोर्ट ट्रस्टकडे रेल्वेची बोलणीही सुरू असून, यासाठी राज्य सरकारकडेही बोलणी केली जात आहे. यासंदर्भात मध्य रेल्वे महाव्यवस्थापकांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठकही झाली. या बैठकीत बॅलार्ड पियरसाठी लागणाऱ्या पोर्ट ट्रस्टच्या जागेबाबत चर्चाही झाली. मात्र त्यामध्ये ठोस असा निर्णय काही झाला नसल्याचे सूत्रांनी सांगितले. या प्रकल्पात वडाळाला बॅलार्ड पियर जोडले गेल्यास सीएसटीवरील हार्बरचा ताण कमी होईल आणि सीएसटीवरील मेन लाइनवरून अधिक लोकल सेवा चालविण्यास मदत मिळेल. (प्रतिनिधी)

Web Title: There is no decision on Wadala road to Ballard Pier proposal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.