पालिकेत दोन वेतनवाढीच्या योजनांना लागणार कात्री
By Admin | Updated: March 1, 2015 00:32 IST2015-03-01T00:32:43+5:302015-03-01T00:32:43+5:30
मराठी भाषेतून पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना दोन वेतनवाढ देण्याच्या आपल्याच वचनावरून पालिका फिरली आहे़ दोन वेतनवाढीसाठीच केवळ मराठी भाषेतून पदवी घेणारे वाढले आहेत़

पालिकेत दोन वेतनवाढीच्या योजनांना लागणार कात्री
मुंबई : मराठी भाषेतून पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना दोन वेतनवाढ देण्याच्या आपल्याच वचनावरून पालिका फिरली आहे़ दोन वेतनवाढीसाठीच केवळ मराठी भाषेतून पदवी घेणारे वाढले आहेत़ त्यामुळे डोईजड झालेल्या या योजनेत नवीन बदल करून मुंबई विद्यापीठातून पदवी मिळवणाऱ्या कर्मचाऱ्यालाच ही
वाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे़
मराठी भाषा पंधरवडा महापालिकेमार्फत साजरा केला जात आहे़ मात्र मराठी भाषेतून शिक्षण घेण्यास प्रोत्साहन देण्यासाठी २०११ मध्ये सुरू केलेली ही योजना पालिकेला आता आर्थिक कटकटीची वाटू लागली आहे़ महापालिकेतील डॉक्टर, अभियंते, कामगारही वेतनवाढ मिळवण्यासाठी पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण करू लागले आहेत़
परिणामी, या योजनेचा खर्च वार्षिक दोनशे कोटी व त्यानंतर कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीवेतनाचा भार पालिकेच्या तिजोरीवर वाढू लागला आहे़ त्यामुळे मराठी भाषेतून कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या पदवीचा पालिकेच्या कामकाजात वापर होत असल्यास दोन वेतनवाढ मिळेल, अशी नवीन अटच प्रशासनाने घातली आहे़ (प्रतिनिधी)
अशा आहेत अटी़़़
वेतनवाढ मिळवण्यासाठी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून मराठी भाषेतून पदवी मिळवणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढली आहे़ त्यामुळे पालिकेने यात बदल करीत यापुढे फक्त मुंबई विद्यापीठातून हा अभ्यासक्रम पूर्ण करणारा तसेच त्याच्या या पदवीचा पालिकेच्या कामकाजात उपयोग होत असल्यास ही वेतनवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे़