मुंबईत वर्षभरात बहरली २४ ‘मियावाकी’ वने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:33 IST2021-02-05T04:33:39+5:302021-02-05T04:33:39+5:30
एक लाख ६२ हजार वृक्षांची लागवड : बहुतांश झाडांनी गाठली चार ते पाच फुटांची उंची लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई ...

मुंबईत वर्षभरात बहरली २४ ‘मियावाकी’ वने
एक लाख ६२ हजार वृक्षांची लागवड : बहुतांश झाडांनी गाठली चार ते पाच फुटांची उंची
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : काँक्रिटच्या जंगलात मुंबईत पुन्हा वृक्षवल्ली बहरली आहे. अवघ्या वर्षभरात २४ ठिकाणी जपानी पद्धतीची ‘मियावाकी’ वने विकसित करण्यात आली. वनांनी आता चांगलेच बाळसे धरले असून तब्बल एक लाख ६२ हजार ३९८ झाडांनी मुंबईच्या सौंदर्यात भर घातली आहे. यापैकी बहुतांश झाडांनी अवघ्या वर्षभरातच चार ते पाच फुटांची उंची गाठली आहे.
विविध प्रकल्प व अतिक्रमणांमुळे मुंबईतील हिरवळ नष्ट होत चालली आहे. त्यामुळे कमीत कमी जागेत अधिकाधिक झाडे असणारी जपानी पद्धतीची ‘मियावाकी’ वने विकसित करण्याचा प्रकल्प गेल्या वर्षी प्रजासत्ताक दिनी हाती घेण्यात आला. यापैकी पहिल्या टप्प्यात लागवड करण्यात आलेल्या २४ ठिकाणी तब्बल एक लाख ६२ हजार ३९८ झाडे लावण्यात आली. तर आणखी ४० ठिकाणी मियावाकी वनांची कामे सुरू आहेत.
* यासाठी मियावाकी वनांची लागवड
सामान्य वनांच्या तुलनेत मियावाकी पद्धतीने विकसित करण्यात येणाऱ्या वनांमधील झाडे ही अधिक वेगाने वाढतात. साधारणपणे दोन वर्षांत विकसित होणाऱ्या मियावाकी पद्धतीच्या वनांमध्ये झाडांमधील अंतर कमी असल्याने ती घनदाट असतात. दोन किंवा तीन वर्षे या वनांची नियमित देखभाल करावी लागते. त्यानंतर ही वने नैसर्गिकरीत्या वाढत राहतात आणि आपल्याला अव्याहतपणे प्राणवायू देत राहतात.
* यांची केली लागवड
मियावाकी वनांमध्ये विविध ४७ प्रकारची झाडे लावण्यात आली आहेत. यामध्ये फळझाडे, फुलझाडे, औषधी गुणधर्म असणारी झाडे अशा विविध प्रकारच्या झाडांचा समावेश आहे. यात प्रामुख्याने चिंच, पळस, करंज, बेहडा, सावर, रतनगुंज, साग, सीताफळ, बेल, पारिजातक, कडूनिंब, बांबू, पेरू, पुत्रजीवा, सीता अशोक, हरडा, खैर, जांभूळ, मोह, बहावा, सुरू, बदाम, काजू, रिठा, शिसम, बकुळ, अर्जुन, फणस, आवळा, कदंब यासारख्या झाडांचा समावेश आहे.
विभाग आणि लावलेली झाडे
एम पूर्व - गोवंडी, मानखुर्द - ३६,४८४
एल - कुर्ला - २१,५२४
पी उत्तर - मालाड पश्चिम - १८,२००
................................