‘तो’ रिक्षाचालक गजाआड
By Admin | Updated: March 8, 2015 00:22 IST2015-03-08T00:22:36+5:302015-03-08T00:22:36+5:30
पंचवीस वर्षीय तरुणीचे अपहरण करून तिचा विनयभंग करणाऱ्या रिक्षाचालकाला अखेर चारकोप पोलिसांनी बेड्या ठोकल्या.

‘तो’ रिक्षाचालक गजाआड
मुंबई : पंचवीस वर्षीय तरुणीचे अपहरण करून तिचा विनयभंग करणाऱ्या रिक्षाचालकाला अखेर चारकोप पोलिसांनी बेड्या ठोकल्या. श्रवणकुमार ऊर्फ शंकर राजेंद्रप्रसाद उपाध्याय (३०) असे या रिक्षाचालकाचे नाव असून गेल्या दोन दिवसांपासून चारकोप पोलीस त्याचा युद्धपातळीवर शोध घेत होते. शनिवारी सकाळी कांदिवली परिसरातून आरोपी उपाध्यायला ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली.
उपाध्याय मूळचा उत्तर प्रदेशमधील बदायु जिल्ह्यातील रहिवासी आहे. दहा वर्षांपूर्वी तो पोटापाण्यासाठी मुंबईत आला. सध्या तो कांदिवलीच्या लालजीपाडा परिसरात असलेल्या इस्लाम कंपाउंडमध्ये भाड्याच्या खोलीत राहत होता. विवाहित असलेल्या उपाध्यायची पत्नी आणि तीन मुले गावी राहतात.
या प्रकरणातील तक्रारदार एका खासगी कंपनीच्या दक्षिण मुंबईतल्या कार्यालयात काम करते. सोबत एका खासगी प्रशिक्षण संस्थेत एमबीएचे शिक्षण घेत आहे. तपास अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या दोन आठवड्यांपासून ही तरुणी उपाध्यायच्या रिक्षात बसून प्रवास करत होती. त्यामुळे या दोघांची एकमेकांशी तोंडओळख होती. मात्र तिला त्याचे नाव माहीत नव्हते. २६ फेब्रुवारी रोजी रात्री दहाच्या सुमारास चारकोपच्या महावीरनगरमध्ये असलेल्या तिच्या घराजवळ रिक्षा न थांबवता ती रिक्षा त्याने पुढे नेली. त्यानंतर तिच्याशी अश्लील चाळे करण्याचा प्रयत्न
केला.
अनपेक्षितपणे उपाध्यायकडून झालेल्या या हल्ल्याने तरुणी घाबरली. या धक्क्यातून सावरते न सावरते तोच उपाध्याय पुन्हा तिच्या नजरेस पडला. त्याला पाहून ती घाबरली. जर तक्रार केली नाही तर या रिक्षाचालकावर कारवाई होणार नाही. असे झाल्यास रिक्षाचालक आपल्याला मनस्ताप देत राहील या भावनेतून अखेर तरुणीने चारकोप पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानंतर कोणताही पुरावा नसताना चारकोप पोलिसांनी उपाध्यायला शोधून काढले. (प्रतिनिधी)
च्आरोपी उपाध्यायने पहिल्यांदा या तरुणीचा विनयभंग केला तर दुसऱ्या वेळेस तिला धमकावले होते. त्यानंतर मात्र तो फरार झाला. या तरुणीकडे उपाध्यायचा मोबाइल नंबर होता. त्याव्यतिरिक्त त्याची काही एक माहिती तिच्याकडे नव्हती. अगदी त्याचे नावही तिला माहीत नव्हते. त्याचा नंबर तिने रिक्षा या नावाने सेव्ह केला होता. गरज पडल्यास ती त्याला फोन करून बोलावून घेई आणि त्याच्या रिक्षातून प्रवास करे. मात्र याचा चुकीचा अर्थ उपाध्यायने घेतला.
च्२६ तारखेला रात्रीदेखील ‘आप मुझसे बात क्यो नही करती’, असे त्याने तिला विचारल्यानंतर या दोघांमध्ये भांडण झाले होते. निव्वळ मोबाइल क्रमांकावरून पोलीस त्याचा शोध घेत होते. त्यातही अनेक अडचणी येत होत्या. अखेर खबऱ्यांचे जाळे पोलिसांच्या मदतीला आले. एका खबऱ्याने तुम्ही शोधत असलेला रिक्षाचालक कांदिवलीत असल्याची टिचकी चारकोप पोलिसांना दिली, अशी माहिती मिळते.