...तर तुमचे कपडे उतरवू
By Admin | Updated: February 16, 2017 05:29 IST2017-02-16T05:28:27+5:302017-02-16T05:29:12+5:30
नागपूर महापालिकेतील भ्रष्टाचारावरून शिवसेनेने केलेल्या आरोपांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खरपूस समाचार घेतला.

...तर तुमचे कपडे उतरवू
मुंबई : नागपूर महापालिकेतील भ्रष्टाचारावरून शिवसेनेने केलेल्या आरोपांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खरपूस समाचार घेतला. ज्या नंदलाल समितीच्या अहवालाच्या आधारे शिवसेनेचे पोपट आरोप करतायत तो अहवालच न्यायालयाने रद्दबातल केलेला आहे. २५ वर्षांच्या राजकारणात माझ्यावर एकही शिंतोडा उडाला नसल्याने हिंमतीने बोलतो. पण माझ्यावर हल्ला कराल तर लक्षात ठेवा ही पारदर्शकता इतकी जबरदस्त आहे की ती तुमचे कपडे उतरविल्याशिवाय राहणार नाही, अशा जहाल शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला दम भरला.
शिवसेना आमदार अनिल परब यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेत देवेंद्र फडणवीस नागपूरचे महापौर असताना गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला. त्यासाठी तत्कालीन सरकारने नेमलेल्या नंदलाल समितीचा अहवालही त्यांनी दाखविला. शिवसेनेच्या या आरोपांना मुख्यमंत्री फडणवीस यांनी चांदिवली येथील भाजपा उमेदवारांच्या प्रचारसभेत चोख उत्तर दिले.
ते म्हणाले की, आता उद्धवजींचे पोपट बोलू लागले आहेत. पण, नंदलाल समितीचा अहवाल वाचण्याआधी त्या पोपटाने उच्च न्यायालयाचा निकाल वाचला असता तर आरोपच केला नसता.
तेव्हाच्या काँग्रेस सरकारने नागपूर महापालिकेविरोधात नंदलाल समिती बसविली होती. पुढे महापालिकाही बरखास्त केली. मात्र, नंदलाल समितीने ठोस पुरावे नसतानाही अहवाल बनविल्याचे सांगत न्यायालयाने तो अहवाल रद्दबातल केला. याविरोधात तेव्हाचे काँग्रेस सरकार सर्वोच्च न्यायालयात गेले. तिथेही तेच घडले, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
‘तो’ अहवाल कोर्टाने फेटाळला
नागपूर महापालिकेतील कथित घोटाळ्यांची चौकशी भाजपाला टार्गेट करण्यासाठी तत्कालिन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी नंदलाल यांच्याकरवी केलेली होती. न्यायालयाने तो अहवाल फेटाळून लावला. तसेच, राज्य शासनाने महापालिका बरखास्तीची दिलेली नोटीसही रद्दबातल ठरविली होती, असे फडणवीस यांनी सांगितले.
मराठी माणसाच्या नावावर संघर्ष करताना स्वत:ची श्रीमंती वाढविणे इतकेच काम शिवसेनेने केले आहे. शिवसेनेच्या युनियन या बड्या कंपन्या आणि त्यांच्या मालकांशी सेटलमेंट करून केवळ स्वत:ची सोय करतात.
मुंबई विमानतळावरील कंबाटा एव्हिएशन प्रकरणातही त्यांच्या युनियनने अशीच सेटलमेंट करत कामगारांना देशोधडीला लावले. कंबाटाच्या तिजोरीतून शिवसेनेच्या शाखाप्रमुखांना, त्यांच्या नेत्यांच्या घरच्यांना पगार जातो, असा आरोपही फडणवीस यांनी केला.
‘अरे पोपटांनो तुम्ही काय खाऊन माझ्यावर आरोप करताय, येत्या २२ फेब्रुवारीला लोकप्रतिनिधी म्हणून मला २५ वर्षे पूर्ण होतील. १९९२ मध्ये पहिल्यांदा निवडून आलो तेव्हा जी संपत्ती घोषित केली तीच आज आहे. त्यात एका नव्या पैशाची वाढ नाही.
केवळ वडिलोपार्जित संपत्ती आहे. १९९९ साली या वडिलोपार्जित संपत्तीची किंमत ३५ लाख होती ती आज साडेतीन कोटी रुपये झाली इतकीच काय ती वाढ. ना बायकोची संपत्ती वाढली ना माझी.
२५ वर्षांच्या राजकारणातही ‘माझा दामन साफ’ आहे म्हणून हिंमतीने बोलतो. माझा तुम्हाला सवाल आहे, तुमच्यापैकी कोणी संपत्ती घोषित करणार आहे. पोपट करणार की साहेब करणार आहे, असा सवाल मुख्यमंत्र्यांनी केला.